रत्नागिरी : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणारे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचा ‘फेम इंडिया-एशिया पोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या देशातील सर्वोत्तम शंभर पोलीस प्रमुखांच्या मानाच्या यादीत समावेश झाला आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या आणि पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.

फेम इंडिया आणि एशिया पोस्ट या प्रतिष्ठित माध्यम संस्थांकडून देशभरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस प्रमुखांची नुकतीच निवड करण्यात आली.

गुन्हेगारीवरील नियंत्रण, कायदा-सुव्यवस्थेचे प्रभावी व्यवस्थापन, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य, आपत्कालीन परिस्थितीत तत्पर निर्णयक्षमता, सक्षम नेतृत्व आणि पोलीस व नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्याची क्षमता अशा विविध महत्त्वपूर्ण निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

नितीन बगाटे यांच्या कार्यकाळात रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई करण्यावर, नागरिकांच्या तक्रारींची वेळेत दखल घेण्यावर आणि जनतेशी सुसंवाद वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि विविध आव्हानांनी व्यापलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाची कार्यक्षमता टिकवून ठेवत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली विविध पातळ्यांवर यशस्वी प्रयत्न झाले आहेत.

त्यांनी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभावी मार्गदर्शन करत नागरिकाभिमुख पोलीसिंगला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या याच कार्यपद्धतीची दखल घेत फेम इंडिया-एशिया पोस्टने त्यांची या राष्ट्रीय यादीत निवड केली आहे.

या मानाच्या यादीत महाराष्ट्रातील एकूण चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश झाल्याने राज्याची मानही उंचावली आहे. विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील पहिल्या पंचवीस पोलीस प्रमुखांना विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार असल्याचेही प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तात नमूद आहे.

कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस दलासाठी नितीन बगाटे यांचा या प्रतिष्ठित यादीतील समावेश नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.