दापोली : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. दापोलीला स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त बनवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महेश धुमाळ यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दापोली शहरातील उत्साही कार्यकारी मंडळाच्या मानाचा गणपती येथे आयोजित ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, मंडळाचे अध्यक्ष संजय घाडगे, माजी नगरसेवक सचिन गायकवाड, संदीप केळकर, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद रानडे आणि शिवाजी गोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

दापोली शहरात रस्त्यांवर अथवा सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा आणि प्लास्टिक टाकणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे धुमाळ यांनी स्पष्ट केले.

दापोलीकर नागरिक नेहमीच सहकार्य करत आले असून हे सहकार्य यापुढेही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष कृपा घाग सातत्याने प्रयत्नशील असून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही कामांचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.

शहरासाठी १५ कोटी रुपयांचे भव्य नाट्यगृह मंजूर झाले असून त्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमादरम्यान माजी नगरसेवक सचिन गायकवाड यांनी नागरिकांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण सूचना मांडत, दापोली ही नररत्नांची भूमी असल्याने शहराचा वारसा, इतिहास आणि ओळख जपणारी एक भव्य आर्ट गॅलरी उभारली जावी, अशी मागणी केली.

या सूचनेचे स्वागत करत प्रशासनाकडून यासाठी नक्कीच सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली. तसेच पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी तालुक्यातील गणेशोत्सव शांततेत व उत्साहात सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करून प्रबोधनात्मक देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मंडळांचे कौतुक केले.

सणांच्या काळात लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींचा विचार करून ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आवाहन तोरस्कर यांनी केले. कायदा सर्वांसाठी समान असून कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही, त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा सत्कार संजय घाडगे, संदीप केळकर व सचिन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. या लोकसंवाद कार्यक्रमास दापोली परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.