रत्नागिरी : कोकणच्या गणेशोत्सवाला सजावटीची किनार लावणाऱ्या आणि दरवर्षी उत्सुकता असणाऱ्या गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ व ७ साठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती मनोर दळी आणि शहर सरचिटणीस निलेश महादेव आखाडे यांनी या स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.

यंदा या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद लाभला. पर्यावरणपूरक सजावट, कोकणी वाडा, किल्ले आणि पौराणिक देखावे अशा वैविध्यपूर्ण संकल्पनांवर साकारलेल्या आकर्षक सजावटींनी परीक्षकांची मने जिंकली असून स्पर्धकांनी पाठवलेल्या फोटो आणि व्हिडिओच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली.

या स्पर्धेत कर्लेकर वाडी येथील सुधाकर सिताराम कर्लेकर यांनी ‘जंगलातील गुहा आणि धबधबा’ या देखाव्यासाठी प्रथम क्रमांक पटकावला, तर विश्वनगर येथील अनिश विजय पेडणेकर यांनी ‘गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला’ या देखाव्यासाठी द्वितीय क्रमांक पटकावला.

द्वितीय क्रमांक : अनिश विजय पेडणेकर

तसेच राजापूर येथील धूतपापेश्वर मंदिराचा देखावा साकारणारे श्रेयस मयेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

याशिवाय राजेंद्र नगर येथील अनिरुद्ध लेले (नारळाच्या झापापासून केलेली सजावट), अभ्युदय नगर येथील सोहम गोडबोले (विष्णू अवतार सागर देखावा), कर्लेकर वाडी येथील सायली कर्लेकर (केदारेश्वर गुहेची प्रतिकृती) आणि आंबेशेत येथील राजेश भारती (आई महालक्ष्मी मूर्ती प्रतिकृती देखावा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले.

तृतीय क्रमांक : श्रेयस मयेकर

या सर्व विजेत्यांना आरती संग्रह, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला आयोजकांसह महिला मोर्चा सरचिटणीस प्रज्ञा टाकळे, शहर उपाध्यक्ष संतोष सावंत, शहर सरचिटणीस नगरसेवक संदीप सुर्वे, विक्रम जैन, सायली बेर्डे, शहर उपाध्यक्ष शैलेश बेर्डे, निधी निलेश आखाडे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस नपुरा मुळ्ये यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेने कोकणच्या गणेशोत्सवाची शोभा वाढवल्याबद्दल आयोजक भक्ती दळी आणि निलेश आखाडे यांनी सर्वांचे आभार मानले.