रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक अतिशय संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या रागातून एका ४१ वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांवर कुऱ्हाड आणि काचेच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या भीषण हल्ल्यात आई आणि वडील दोघेही गंभीर जखमी झाले असून, दापोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल मधुकर आग्रे असे या हल्लेखोर मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास दापोली तालुक्यातील जालगाव पांगारवाडी येथे घडली. आरोपी सुनिल याने त्याच्या ६० वर्षीय आईकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती.
मात्र, तिने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्याला तीव्र राग आला. रागाच्या भरात त्याने एका हातात कुऱ्हाड आणि दुसऱ्या हातात काचेची बाटली घेतली. ‘तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही, ठार मारून टाकतो’ अशी धमकी देत त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
संबंधित पीडित महिला तोंड धुण्यासाठी जात असताना सुनिलने तिला वाटेत अडवले आणि तिच्या डोक्यात काचेची बाटली फोडून तिला दुखापत केली.आईवर हल्ला केल्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपला मोर्चा वडिलांकडे वळवला.
घराच्या पडवीत बसलेले त्याचे ६५ वर्षीय वडील मधुकर नारायण आग्रे यांच्या दिशेने तो धावत गेला. त्याने हातातील कुऱ्हाडीने वडिलांच्या डोक्यावर आणि हातावर सपासप वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले.
आई आणि वडील दोघांनाही जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने हा भयंकर हल्ला केला. या घटनेमुळे जालगाव पांगारवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दापोली पोलिसांनी आरोपी सुनिल आग्रे याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०९(१), ३५१(३) आणि ३५२ अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

