रत्नागिरी : ‘आजादी का अमृत महोत्सव’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या आवाहनाला साद देत रत्नागिरीत सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. श्रावणाच्या रिमझिम पावसात आणि ‘भारत माता की जय’च्या निनादात संपूर्ण रत्नागिरी शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.
शहरातील मारुती मंदिर चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा शुभारंभ झाला. पोलीस बँड पथकाने वाजवलेले ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत आणि राज्यगीत यामुळे सभोवतालचे वातावरण भारावून गेले होते.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत तरुणांपासून ते वयोवृद्ध आणि दिव्यांगांपर्यंत सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते.
रॅली शासकीय रुग्णालयाजवळ आल्यावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर देशभक्तीपर गीतांच्या तालावर हा जनसागर जयस्तंभ चौकात पोहोचला, जिथे पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या ऐतिहासिक परंपरेचा अभिमान व्यक्त केला. रत्नागिरीची भूमी ही शिवछत्रपती, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असल्याचे सांगून, राजकीय मतभेद विसरून रत्नागिरीकर ज्या एकजुटीने तिरंग्याखाली उभे आहेत, ते संविधानाचे आणि देशप्रेमाचे ज्वलंत उदाहरण असल्याचे ते म्हणाले.
देशाच्या सीमेवर पहारा देणाऱ्या आणि निवृत्तीनंतर समाजात वावरणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
पुढील वर्षापासून १५ ऑगस्टला माजी सैनिकांचा मेळावा आयोजित केला जाईल, तसेच येत्या १४ ऑगस्टच्या तिरंगा रॅलीपूर्वी रत्नागिरीत दिमाखदार सैनिक उद्यान आणि जिल्हा सैनिक भवन उभारले जाईल व त्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी ही रॅली तब्बल एक लाख नागरिकांच्या उपस्थितीत निघेल, असा संकल्पही त्यांनी सोडला.
याच कार्यक्रमात स्वतःचा जीव धोक्यात घालून तणव याचे प्राण वाचवणाऱ्या आयुष कामेरकर, अनुप कामेरकर, सार्थक जठार, भरत जठार आणि आयुष गांधी या साहसी युवकांना मानाचा तिरंगा देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.
विविध शाळांचे विद्यार्थी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेली ही तिरंगा रॅली केवळ एक सोहळा न राहता, प्रत्येक रत्नागिरीकराच्या मनात राष्ट्रप्रेमाची अखंड ज्योत प्रज्वलित करणारा एक ऐतिहासिक क्षण ठरली.

