कोकणातील शेतकऱ्यांनी शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा – कुलगुरु डॉ. संजय भावे

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, घरडा फाऊंडेशन आणि घरडा केमिकल्स, लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने अनसपुरे तालुका खेड येथे दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मंडळस्तरीय शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे कोकणातील पहिल्याच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अध्यक्ष स्थानावरुन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे बोलत होते. डॉ. संजय भावे यांच्या संकल्पनेतून कोकणातील प्रत्येक कृषी मंडळानुसार पीक निहाय किमान एकतरी शेतकरी मेळावा आयोजन करण्यासाठी कुलगुरु यांनी आवाहन केले आहे.

त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कोकणातील पहिला मंडळ निहाय कृषी मेळावा खेड तालुक्यातील खेड मंडळाअंतर्गत येणाऱ्या अणसपुरे या गावात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कुलगुरु पुढे म्हणाले की, कृषी विद्यापीठ खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे असेल तर दुर्गम भागात अशा प्रकारचे प्रदर्शने व मेळावे आयोजित केल्यास विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यत सहज पोहोचविणे शक्य होईल.

शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती करत असताना त्याला विद्यापीठाने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाची जोड दिली आणि विविध पिकांच्या जातींचा वापर करून शेती म्हणजे एकू पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून शेतीकडे पहावे.

विशेषतः एकात्मिक शेतीच्या माध्यमातून शेती केल्यास गावामध्येच उत्पन्नाची साधने उपलब्ध होणेफ सहज शक्य आहे.

शेती या व्यवसायाला दुसरा पर्याय नसून हा निरंतर चालणारा व्यवसाय असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा असे आवाहन केले.

सकाळच्या सत्रात काजू व आंबा या पिकांवर रोग व्यवस्थानासाठीचे फवारणीचे प्रात्यक्षिक आणि आंबा पुनरुज्जीवनाचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले.

या मेळाव्याला कृषी विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषी सहाय्यक अविनाश निकम यांचा सत्कार कुलगुरु व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध पुरस्कारप्राप्त शेतकरी भगिनी व शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व विद्यापीठाची दैनंदिनी व भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले.

या मेळाव्याला अणस्पुरे गावातील आणि पंचक्रोशीतील जवळ जवळ २५० हून अधिक महिला आणि पुरुष शेतकरी उपस्थित होते.

यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विविध पिकांवर मार्गदर्शन करुन शेतकयांच्या शंकांचे निरसन केले.

या प्रदर्शनात विद्यापीठाने कोकणातील विविध पिकांच्या विकसीत केलेल्या जाती, विविध यंत्रे व अवजारे, बांबूपासून तयार करण्यात आलेली विविध हस्तशिल्पे, सेंद्रीय उत्पादने, जैविक खते व बुरशीनाशके तसेच विद्यापीठाने विकसीत केलेले विविध शिफारशींच्या तंत्रज्ञानाची माहिती तक्यांव्दारे सादर करण्यात आली.

अणसपुरे मालपवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात सदर मेळाव्याचे आयोजन व विद्यापीठाचे प्रदर्शनीय दालन उभे करण्यात आले होते.

याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी दिशांत कोळप, अणसपुरे गावचे सरपंच संतोष मालप, माजी पंचायत समिती सदस्या समिक्षा जाधव, पंचक्रोशी गावातील विविध सरपंच, घरडा केमिकल्सचे तुषार हळदवणेकर, तालुका कृषी अधिकारी रविंद्र माळी, सहयाद्री शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मुस्तफा अंतुले, मुंबके गाव सरपंच, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक, डॉ. संतोष वरवडेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. एस. डी. देसाई विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. मंदार खानविलकर, डॉ. बी. डी. शिंदे, श्रीकांत रिटे, चिपळूण, खेड, गुहागर, दापोली, मंडणगड तालुक्याच्या मंडळनिहाय शेतकरी मेळाच्याचे आयोजनाचाचे समन्वयक, मंडळ कृषी अधिकारी प्रविण घाणेकर, कृषी पर्यवेक्षक बिरनाळे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे संतोष बुरटे, अमोल म्हसकर, राजेश दिवेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. संतोष वरवडेकर आणि तालुका कृषी कृषी अधिकारी माळी, कृषी सहाय्यक रविंद्र निकम यांनी परिश्रम घेतले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*