रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत आठ जणांना जाळ्यात अडकवले असून, यामध्ये जमिनीचे व्यवहार, सातबारा उतारे आणि फेरफार नोंदीसारख्या कामांसाठी लाच मागणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, एका बाजूला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कोकण दौरा सुरू असताना आणि खुद्द कोकण विभागीय आयुक्त कोकणात उपस्थित असतानाही महसूल विभागातील कर्मचारी लाच घेताना रंगेहात सापडला.

प्रशासनातील एवढ्या दोन महत्त्वाच्या उच्चपदस्थ व्यक्तींचा दौरा सुरू असतानाही संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांमध्ये लाच घेण्याची हिंमत होत असल्यावरून, प्रशासनाचा धाक किंवा भीती नावाची गोष्ट पूर्णपणे संपुष्टात आल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

रत्नागिरीसह चिपळूण, मंडणगड आणि राजापूर परिसरात अलीकडच्या काळात लाचखोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. चिपळूण येथे मंडळ अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के याला फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ऑगस्ट २०२६ मध्ये चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव याला सातबारा फेरफार मंजुरीच्या कामासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. याशिवाय, मे २०२६ मध्ये म्हाप्रळ येथील मंडळ अधिकारी अमित शिगवण आणि तलाठी श्रीनिवास श्रीरामे यांच्यावर जमिनीच्या उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणात मंडणगड उपकोषागार कार्यालयातील शिपाई मारुती भोसले यालाही अटक झाली होती.

राजापूर तालुक्यातील तळवडे येथे मे महिन्यात सातबारा उताऱ्यावर पतीचे नाव नोंदवण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मंडळ अधिकारी पुनम जयसिंग गावित आणि कोतवाल संजना नंदकुमार माने यांच्यावर कारवाई करण्यात आली. रत्नागिरी तालुक्यातील सझा आकले येथील तलाठी गणेश अर्जुन सुर्वे याच्यावरही फेरफार नोंदीच्या कामासाठी लाच मागितल्याप्रकरणी कारवाई झाली आहे.

या महसूल कारवायांशिवाय ३ जून २०२६ रोजी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग-१ च्या संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला गर्भपातासाठी आवश्यक औषध किट उपलब्ध करून देण्यासाठी एका गरोदर महिलेकडे साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.

सातबारा उतारा, फेरफार नोंद आणि जमिनीच्या नोंदीत नाव समाविष्ट करणे यांसारखी कामे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असल्याने, अशा कामांसाठी पैशांची मागणी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याबरोबरच लाचखोरीला प्रोत्साहन देणारी साखळी नष्ट करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत कठोर भूमिका घेण्याची आणि महसूल विभागाचा कारभार पारदर्शक करण्याची तीव्र मागणी होत आहे.