दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचे आयोजन दापोली येथील विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहामध्ये दिनांक ९ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.

या तीन दिवस चालणाऱ्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच विशेष उपस्थितीमध्ये कृषि सचिव पग्मिल सिंग, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, कृषि आयुक्त सुरज मांडरे आणि राज्यातील चारही विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित राहणार असून यजमान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपद भूषवणार आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीमध्ये राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमध्ये गतवर्षात झालेल्या संशोधनावर साकल्याने चर्चा होणार असून चारही विद्यापीठांमधील ३०० हून अधिक शास्त्रज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत.

या बैठकीमध्ये शेतकरी, कृषि विभाग, दुग्धशास्त्र विभाग आणि हवामान विभाग यांच्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधनपर शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.

यावर्षीच्या बैठकीच्या यजमानपदाचा मान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला मिळाला असून या विद्यापीठातर्फे प्रसारणाकरिता १ यंत्र अवजारे, विविध पिकांतील ३६ तंत्रज्ञान शिफारशी आणि पूर्व प्रसारणाकरीता १ वाणाची शिफारस बैठकीमध्ये ठेवली जाणार आहे.

याशिवाय पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे १० प्रस्तावित वाण, प्रसारणाकरीता १६ यंत्रे व अवजारे, ८६ पिक तंत्रज्ञान शिफारशी, ६ पूर्व प्रसारणाकरीता वाण, तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे ११ प्रस्तावित वाण, ५ यंत्रे व अवजारे, ८६ पिक तंत्रज्ञान शिफारशी, ९ पूर्व प्रसारणाकरीता वाण आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे ५ प्रस्तावित वाण, ४ यंत्रे व अवजारे, ४२ पिक तंत्रज्ञान शिफारशी मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहेत.

तसेच महाराष्ट्र राज्यांतर्गत येणाऱ्या कृषि, मत्स्य, फलोत्पादन आणि पणन यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे सादरीकरण या बैठकीदरम्यान होणार आहे.