दापोली : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे ७ सप्टेंबर २०२६ रोजी राजे उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे आणि महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवणारे उमाजी नाईक हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील एक अग्रणी योद्धे होते.
त्यांनी पुण्याच्या रामकिल्ल्यावर आणि पुरंदर परिसरात ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा उभारून त्यांच्या छावण्यांवर हल्ले चढवले होते.

सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष पुकारला आणि जनतेच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटवली.
महाराष्ट्रातील या महान स्वातंत्र्यसैनिकाचे क्रांतिकारी विचार आजही तरुण पिढीला देशसेवेसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देतात.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहली.

