मुंबई : समाज धारणेचा विचार, माणुसकीचा विचार, उदात्त संस्कार आणि दिव्यशक्तीचा आधार.. या साऱ्यातून आज आपण सर्वसामान्यांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाला आहात. याचमुळे, समाजकारण नि राजकारणातले आपण मानदंड ठरला आहात, असे प्रशस्तीपर गौरवोद्गार मुंबई विद्यापिठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांनी काढले.
निमित्त होते, देशाचे भूतपूर्व केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते श्री. अनंत गीते लिखित तेलीगल्ली ते नवी दिल्ली या अत्यंत वाचनीय आणि हृदयस्पर्शी पुस्तकाच्या प्रकाशनाचे!
मुंबईतील माटुंगा येथील गुरूनानक खालसा कॉलेजमध्ये गुढीपाडव्याच्या अत्यंत पवित्र मुहुर्तावर एका दिमाखदार व मांगल्यमय कार्यक्रमात अनंत गीते लिखित तेली गल्ली ते नवी दिल्ली या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी व्यासपिठावर डॉ. देशमुख यांच्यासमवेत इस्कॉनचे स्वामी सूरदास, गायिका देवयानी मुजुमदार, माजी आमदार व ज्येष्ठ सहकारी सुरेश गंभीर, नवचैतन्य प्रकाशनचे शरद मराठे, काळोजी मोकल, हरिश्चंद्र गीते, विजू कवळे, साहित्यिक व विधिज्ञ विलास नाईक, ज्येष्ठ सहकारी अरविंद विचारे, अप्पा खानविलकर, तेली गल्लीतील राजा सुतार, सुभाष मांजरेकर, खालसा शिक्षण संस्थेचे विश्वस्त गोविंदसिंह नाथ, प्राचार्य किरण माणगावकर, शुभकुंदा प्रतिष्ठानचे प्रवीण नागरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. विशेष म्हणजे तेली गल्ली ते नवी दिल्लीपर्यंत विविध क्षेत्रातील सनदी अधिकारी, सल्लागार, सचिव, डॉक्टर, वकील, अभियंते, लोकप्रतिनिधी, साहित्यिक, समाजसेवी, उद्योजक, रायगड रत्नागिरीमधील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक अशा सर्व थरातील मंडळींची उपस्थिती या कार्यक्रमाला होती.
गुढीपाडवा या अत्यंत महत्त्वाच्या सण दिवशी देखील शेकडोंच्या संख्येने या कार्यक्रमाला लाभलेली उपस्थिती ही लक्षवेधी ठरली. सर्वसामान्य पण, ज्येष्ठ शिवसैनिकांना तसेच त्यांच्याबरोबर गेली पन्नास वर्ष कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रातील सर्वसामान्य मंडळींना अनंत गीते यांनी दिलेला सन्मान यातून राजकारण आणि समाजकारणातील त्यांची संस्कृती आणि सौंदर्य, मार्दव, साधेपणा यातून भावविभोर करणारी कृतज्ञता अधोरेखित झाली.
राजकारणातही संस्कृती आणि संस्कार असतात हे अनंत गीते यांच्यासारख्या अतुलनीय व्यक्तित्वातून दिसतात, असे इस्कॉन मुंबईचे सूरदास यांनी सांगितले. राष्ट्र निर्माणाच्या कार्याला त्यांनी सदैव जोडून राहावे, असा सल्ला दिला.
सर्वसामान्यांच अत्यंत प्रभावी नेतृत्व म्हणून भूतपूर्व केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांची गत पाच दशकातील कारकीर्द आहे. त्यामुळे जर त्यांना टाळण्याचा व दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला तर लाखमोलाचा कार्यकर्ता त्याला उत्तर द्यायला समर्थ आहे, असा इशारा जेष्ठ शिवसैनिक अप्पा खानविलकर यांनी दिला. संघर्ष थांबलेला नाही तर लढा सुरूच ठेवावा लागेल, असे विलास नाईक यांनी सांगितले. माजी आमदार सुरेश गंभीर यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
अनंत गीते लिखित तेली गल्ली ते नवी दिल्ली, हे पुस्तक अत्यंत वाचनीय, मननीय आणि चिंतनीय असल्याचा उल्लेख प्रमुख अथिती माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांनी केला. स्वच्छ चारित्र्य, मनमिळावू स्वभाव आणि धवल धन या त्रिसूत्रीने ग्रामीण भागासह संसदेपर्यंत विविध स्तरावर आपली नाममुद्रा अनंतजींनी उमटवल्याचे त्यांनी नमूद केले. या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याची संधी मला मिळाली, त्यामुळे प्रकाशन पूर्व हे पुस्तक वाचताना अनेकदा त्यातील प्रसंग हे भावनाविवश करून गेल्याचे डॉ. देशमुख म्हणाल्या.
पुस्तकाचे लेखक म्हणून या निर्मिती मागची कथा भूतपूर्व केंद्रीय मंत्री श्री. गीते त्यांनी सांगीतली. कोरोना काळामध्ये माझी नात विदिशा ही मला गोष्ट सांगण्याचा आग्रह करू लागली. तिला दररोज कोणत्या गोष्टी सांगाव्यात? असा विचार करता, रोज एक पान मी तिच्या पणजोबा, खापर पणजोबा व इतर नातेवाईक संदर्भाने लिहून देऊ लागलो. माझी पुतणी आणि विदिशाची आई अस्मिता तिला ते वाचून दाखवायची हा कार्यक्रम मग ठरुन गेला. असं करताना आमच्या कुटुंबावर एक छोटी पुस्तिकाच बनून गेली. आठवणींचा खजिना या नावानं ते हस्तलिखित पुस्तक रुपाने ते साकारलं.
गेली काही वर्षे माझ्या वाटचालीच पुस्तक यावं, असे काहीजण सुचवित होते. यातूनच तो विषय प्रबळ झाला. १७ मे २०२१ ते १० जानेवारी २०२२या कोरोना कालावधीमध्ये स्वतः लेखन केल. माझ्या हाताने मीच लिहिलेला माझा इतिहास हा या पुस्तकाच्या निमित्ताने पुढे आला आहे. कौटुंबिक व शालेय जीवन, खडतर मार्ग, शिवसैनिक म्हणून सामाजिक राजकीय जीवनाचा पट.. असं सारं काही त्यात आहे.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला समर्पित !
असा हा पहिलाच कार्यक्रम ठरावा की शिवसेनेच्या नेत्याच्या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या हस्ते होत आहे. एक नवा पायंडा या कौटुंबिक कार्यक्रमातून स्थापित झाला आहे. विशेष कृतज्ञतेने सांगायचं म्हणजे माझ्या राजकीय प्रवासात मला सदैव साथ देणाऱ्या रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला हे पुस्तक मी समर्पित केलं आहे, असे शिवसेना नेते, भूतपूर्व केंद्रीय मंत्री व पुस्तकाचे लेखक श्री. अनंत गीते यांनी सांगताच काही काळ सभागृह टाळ्यांच्या निनादात गर्जत राहिलं.
शिवतीर्थ, जन्मस्थान नि खालसा कॉलेज!
माझे वडील सैन्यात होते. निवृत्तीनंतर ते खालसा कॉलेजमध्ये शिपाई म्हणून त्यांनी काम केले. याच परिसरातील एका झोपडीत माझा जन्म झाला. त्या जन्म ठिकाणाचे कार्यक्रमापूर्वी पूजन केले. तत्पूर्वी शिवतीर्थावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून या कार्यक्रमाला आलो आहे हे गीते यांनी सांगताच संपूर्ण सभागृह टाळ्यांचा गजर करीत उभ राहिलं.
शिवसेना नि मराठी माणूस
शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं याचा घटना आणि तपशील व व्यक्तीच्या नावानिशी प्रसंग सांगत शिवसेना व मराठी माणसाचा ऊहापोह हे पुस्तक केला आहे. पण, याचबरोबर जुनी शिवसेना आणि संघटना कशी होती, यांचही दर्शन या पुस्तकातून वाचकांना होईल. यामुळे आजच्या पिढीला मार्गदर्शक आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असे हे पुस्तक असल्याचे गीते सांगितले.