रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह (भा.प्र.से.) यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी मनुज जिंदल (भा.प्र.से.) यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

मनुज जिंदल हे यापूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. शासनाने एम. देवेंदर सिंह यांची बदली करून त्यांच्या जागी मनुज जिंदल यांची नियुक्ती ‘जिल्हाधिकारी, रत्नागिरी’ या पदावर वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून केली आहे.

नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना त्यांच्या सध्याच्या ‘सह व्यवस्थापकीय संचालक, म.रा.र.वि.मं., मुंबई’ या पदाचा कार्यभार अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, रत्नागिरीतील नवीन पदाचा कार्यभार एम. देवेंदर सिंह यांच्याकडून तातडीने स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आपल्या कार्यकाळात एम. देवेंदर सिंह यांनी रत्नागिरी जिल्ह्यात विकासकामे आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या बदलीमुळे जिल्ह्याच्या प्रशासनात नेतृत्वाचा बदल झाला आहे. आता नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे रत्नागिरीच्या प्रशासनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.