दापोली : येथे ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी व्यावसायिक शैलेश मोरे यांना शनिवारी अटक करण्यात आली. आज रविवारी कोर्टात हजर केल्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. शैलेश मोरे यांच्याविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश मोरे यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट शेअर केली होती. मुरुड येथील विराज खोत या युवकाने ही बाब लक्षात आणून दिली.
27 जून रोजी सायंकाळी याची माहिती मिळताच, विराज याने दापोलीतील ब्राह्मण समाजाच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत कळवले. त्यानंतर समाजातील काही व्यक्ती आणि युवकांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
28 जून रोजी शैलेश मोरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 196 (1), (अ) आणि 299 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला व त्यांना अटक झाली.
शैलेश मोरे यांना आता न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.