जुलै १९७६ मध्ये मी दापोलीच्या एन. के. वराडकर कला आणि आर. व्ही. बेलोसे वाणिज्य महाविद्यालयात इतिहासाचा प्राध्यापक म्हणून दाखल झालो.

महाविद्यालय नवीनच सुरू झाले होते. जेमतेम दोन वर्षे झाली होती. सुरुवातीला महाविद्यालयास इमारतदेखिल नव्हती.

एका शाळेच्या इमारतीमध्ये ते सुरू झाले होते. वर्षभराने महाविद्यालय स्वतःच्या नवीन इमारतीमध्ये गेले. महाविद्यालय नूतन असल्याने प्राध्यापकांचा तरूण वर्ग होता.

प्रारंभी वेगवेगळ्या विषयाचे १० प्राध्यापक होते. त्यामध्ये माधव कर्वे हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या व्यक्तीचा प्रथम परिचय झाला व पुढे आमचे मैत्रीचे संबंध वाढत गेले.

१९७६ ते १९८० या चार वर्षांचा प्राध्यापक म्हणून त्यांचा सहवास लाभला. पुढे १९८० मध्ये ते एम्. पी. एस. सी. परीक्षा पास होऊन पोलीस उपअधीक्षक पदावर रूजू झाले.

पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेतून ते एम. ए. झाला होता. अत्यंत हुशार अभ्यासू, बुध्दीमान असा अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात ख्यातनाम होता.

गोखले अर्थशास्त्र संस्थेतील अर्थशास्त्राचे अर्थतज्ज्ञ प्राध्यापक डॉ. दांडेकर यांचा तो विद्यार्थी होता. त्यांचा सहवास व मार्गदर्शन लाभलेले असल्याने विषयाची उत्तम जाण त्याच्याकडे होती.

खरं तर अर्थशास्त्र हा विषय शिकविण्यास रूक्ष व किचकट विषय, परंतु माधव कर्वे अत्यंत सुलभ व सोप्या भाषेत मांडणी करून शिकवत असे.

विषयाचे अकलन उत्तम असल्याने त्याला ते सहजरितीने जमत असे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थीप्रिय झाला. त्याच्या शिकविण्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये सतत होत असे.

विषयाच्या ज्ञानामुळे वर्गावर त्याचे नियंत्रण होते. महाविद्यालयात अर्थशास्त्र विषय विद्यार्थ्यांमध्ये प्रिय करण्यात त्याचे मोठे योगदान होते याचे आणखी एक कारण म्हणजे त्याचे स्वतःचे विषयावर प्रेम होते.

तो विषयाची तयारी उत्तम करून येत असे. अनेक सदर्भ ग्रंथ त्याच्याकडे होते. त्याचे स्वतःचे ग्रंथालय समृध्द होते. अनेक पुस्तके त्याच्या संग्रही होती.

हे मी जवळून पाहिले व अनुभवले आहे. अर्थशास्त्राशिवाय राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, अध्यात्म, जनरल नॉलेज, या विषयावरील ग्रंथ त्याच्याकडे होते खर तर तो हाडाचा प्राध्यापकच होता तो उत्तम वाचक होता.

महाविद्यालयात शिकविण्या व्यतिरिक्त इतर अभ्यासेत्तर विभागात काम करावे लागते. ते म्हणजे वादविवाद, राष्ट्रीय सेवा योजना, कला मंडळ, क्रीडा विभाग, वार्षिकांक विभाग, सहल विभाग या सर्व विभागात तो सक्रिय होता. विशेषतः दरवर्षी वर्षा सहल काढण्याची जबाबदारी प्रा. माधव कर्वे यांच्याकडे असे.

सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात ही वर्षा सहल दोन ते तीन मैल दूर असणाऱ्या पर्यटनस्थळी पायी जात असे. महाविद्यालयातील सर्व मुलं-मुली त्यामध्ये सहभागी होत असत.

त्या सर्व ४०० ते ५०० विद्यार्थ्यांवर उत्तम प्रकारे नियंत्रण प्रा. माधव कर्वे करीत असत. कुठेही गडबड गोंधळ, बेशिस्त हा प्रकार नसे कॉ सरांच्या करडया नजरेचा हा प्रभाव असे. अनेक टारगट विद्यार्थी त्यांच्यापुढे नतमस्तक होत असत. असा दरारा त्यांचा असे.

अत्यंत चांगल्या वातावरणात वर्षा सहल पार पडत असे व त्याचा आनंद विद्यार्थी घेत असत. विनोद, गाणी, पर्यटन स्थळाची माहिती, भोजन हे सर्व कार्यक्रम त्यास्थळी आयोजित केले जात.

प्रा. माधव कर्वे हे एक कुशल संयोजक होते.कोणत्याही कार्यक्रमाचे संयोजन ते रेखीव व आखीव पध्दतीने करीत असत.

महाविद्यालयातील कवि संमेलन, वक्तृत्व स्पर्धा, स्नेहसंमेलन या कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्याकडे असे, प्रा माधव कर्वे हे उत्तम वक्ते होते, वक्तृत्व कलांचे गुण त्यांच्याकडे असल्याने ते प्रभावीपणे विषयातील मुद्दे मांडत असत.

विद्यार्थ्यांच्या वक्तत्व स्पर्धेचे मार्गदर्शन ते करीत असत. स्नेहसंमेलन प्रसंगी एकांकिका सादर केल्या जात. त्याचेही दिग्दर्शन ते करीत असत.

तीन दिवस चालणाऱ्या स्नेह संमेलनावर नियंत्रण ठेवून ते यशस्वी पार पाडण्याची जबाबदारी निभावत असत, त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य चिंतामणी सहस्त्रबुध्दे त्यांचे कौतुक करून त्यांना सन्मान करीत.

राष्ट्रीय सेवा योजना विभागातील त्यांचे कार्य महत्वपूर्ण होते. गव्हे, जालगांव, टाळसुरे, गिम्हवणे यासारख्या खेडे गावात जावून विद्याथ्यांचे दहा दिवसांचे निवासी कॅम्प आयोजित करण्याची जबाबदारी ते सहजरितीने पेलवत.

गावातील लोकांना स्वयंसेवकांबरोबर घेऊन रस्ते तयार करणे, वृक्षारोपण, बंधारे बांधणे, इत्यादी प्रकल्प हाती घेऊन त्यांनी ते यशस्वी केले.

त्यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील या योगदानाबद्दल कार्यक्रमाधिकारी म्हणून विद्यापिठाने दखल घेतली होती. महाविद्यालयातील आदर्श प्राध्यापक म्हणून प्रा. माधव कर्वे यांनी आपली प्रतिमा विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये निर्माण केली होती.

विद्यार्थी घडविणारा शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करून प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व त्यांनी निर्माण केले होते.

संकटात, अडचणीत असणाऱ्या गरीब विद्यार्थ्याला मदत ते जाणिवपूर्वक करीत असत. त्यांच्या संस्काराचा व आदर्शाचा परिणाम हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवरच झाला नाही, तर आमच्यासारख्या प्राध्यापकांवरदेखिल झाला. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.

१९८० मध्ये ते जेंव्हा पोलीस खात्यात रुजू झाले व महाविद्यालय सोडून गेले, तेंव्हा आम्हा प्राध्यापकांना, प्राचार्यांना व विद्याथ्यर्थ्यांना त्यांची खूपच पोकळी जाणवली, त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात आम्ही ही खंत व्यक्त केली होती.

माधव कर्वे यांची पोलीस खात्यात नैतिक मूल्ये जपणारा अधिकारी अशी प्रतिमा होती. त्यांनी कधीही तडजोडी केल्या नाहीत व कुठल्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत, सामान्य जनतेला न्याय कसा मिळेल, तसेच त्यांची संकटातून कशी मुक्तता होईल यासाठी ते प्रयत्नशील असत.

त्यांच्या या प्रकारच्या कार्यपध्दतीमुळे पोलीस खात्याची प्रतिमा अधिक उंचावण्यास सहाय्यक होत असे. अनेक गुन्ह्याचा शोध त्यांच्या नियंत्रणाखाली लागला, रायगड, बीड याठिकाणी एस. पी. असताना त्यांची कर्तव्यदक्षता जाणवली.

मुंबई येथे पोलीस मुख्यालयात ते प्रशासन अधिकारी होते. पुणे येथे येरवडा तुरुंगाचे पोलीस उपमहानिरिक्षक असताना जेल प्रशासन कार्यक्षम करून कैद्यांचे विविध प्रश्न सोडविले.

सी. आय. डी. विभागात काम करीत असताना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रतिमा निर्माण केली. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात ते यशस्वी झाले. डी. जी. शिवाजीराव बारवकर, सोमण, बापट अरविंद इनामदार यासारख्या अधिकाऱ्यांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

पोलीस दलातील त्यांच्या सर्वोत्तम कारकीर्दीमुळे ते राष्ट्रपती पदकाचे मानकरी ठरले, प्राध्यापक ते कर्तव्यदक्ष अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक म्हणून ख्यातनाम असलेल्या माधव कर्वे यांची व माझी १९७६ ते २०२३ अशी ४७ वर्षे अतूट मैत्री होती.

आम्ही आमच्या कौटुंबिक सुख दुःखात सहभागी होत असू, माणसांवर प्रेम करून आनंद देणाऱ्या माधव कर्वे यांचे २२ जानेवारी, २०२३ रोजी निधन झाले, या घटनेला आता एक वर्ष झाले.

ही घटना माझ्यासारख्या मित्राला खूपच क्लेशदायक होती, त्यांचा आज दापोली येथे प्रथम स्मृतिदिन साजरा होत आहे.

दि. १० फेब्रुवारी रोजी त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दापोलीजवळील गिम्हवणे येथे त्यांच्यावर काढलेल्या स्मृति ग्रंथाचे प्रकाशन प्रा. शांता सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते संपन्न होत आहे.

– प्रमोद गंधे, दापोली मोबा. ९४२२०५२०७१