दापोलीकरांनी काढली १४ मार्चला सायकल फेरी
दापोली (अंबरीश गुरव) : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रिण, शिक्षिका इत्यादींप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा गौरव, सन्मान करण्यासाठी दापोलीकरांनी रविवारी, १४ मार्च २०२१ रोजी सायकल फेरी काढली.

दापोलीच्या जडण घडणीमध्ये महत्वाचे योगदान दिलेल्या अनेक आदरणीय महिला या सायकल फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली- लालबाग- उदयनगर- जालगाव लष्करवाडी- महालक्ष्मी मंदिर- ब्राम्हणवाडी- चैतन्य नगर- भाटकर हॉस्पिटल- आझाद मैदान असा होता.

या मार्गावर राहत असलेल्या मुख्याध्यापिका उज्वला दत्तात्रय वैशंपायन, शांता सहस्त्रबुद्धे, नीलिमा अशोक देशमुख, समाज सेविका डॉ विद्या दिवाण, संपदा पारकर, मोडक हॉस्पिटल, भाटकर हॉस्पिटल व भागवत हॉस्पिटल येथील परिचारिका अवनी कदम, अंकिता चव्हाण, वैशाली गिम्हवणेकर, डॉ. नेहा भागवत, ऐश्वर्या पेवेकर, स्नेहल धोत्रे, प्रगतशील शेतकरी गंधाली गजानन कांबळे, नगरसेविका जया साळवी, रमा अमोल तांबे, शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य सिद्धी पाते, दिपाली महेश भैरमकर, ज्योती जयेश भावे, वैशाली श्रीराम इदाते, हॉटेल व्यावसायिक ज्योती जगदीश बेलकर, खेळाडू, प्रसिद्ध लेखिका रेखा जेगलकर, योगा शिक्षिका हर्षदाताई डोंगरे, नर्सरी क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या उद्योजिका सुषमा प्रभाकर शिंदे, वंदना विजय धोपट, गृहिणी, वाडीप्रमुख, महिला बचतगट क्षेत्रात कार्यरत पूनम राजेंद्र चव्हाण, अंगणवाडी सेविका सुरेख वसंत जगदाळे, सुनैना कदम, विद्या सुर्वे, डॉ मधुरा जोशी, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही महिलांचा गौरव करण्यात आला.

समाजासाठी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. अनेक महिलांनी सायकल फेरीमध्ये सहभाग घेऊन सोबत सायकल पण चालवली.

यातील बहुतेक सर्वांनीच लहानपणी खूप सायकल चालवली होती आणि आता पुन्हा सायकल चालवायला सुरवात करणार असे ठामपणे सांगितले.

ग्रामपंचायत सदस्या ज्योती भावे, हेमांगी उदय जाधव, डॉ. अमृता अनिल होन, नुकतेच ७२ किमी सायकल स्पर्धेत महिलांमध्ये पहिला नंबर पटकावलेल्या सौ. मोहिनी विक्रांत पाटील, उद्योजिका मृणाल मिलिंद खानविलकर, रागिणी रिसबूड, अपर्णा बुटाला, डॉ मधुरा जोशी, क्षमा गावकर, इत्यादी अनेक महिला आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा वापर खूप करतात.

बाजार किंवा जवळपास जाण्यासाठी गाडीपेक्षा सायकलला प्राधान्य देतात. काहीजणी आपली लहान मुले, मुली, नवरा, आई, बाबा यांच्यासोबत एकत्र सायकल चालवत फिरायला पण जातात. हे खूपच प्रेरणादायी आहे.

सायकलमुळे आरोग्य तंदुरुस्त बनते, प्रतिकारशक्ती वाढते आणि इतरांपासून अंतर पण राखले जाते.
आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही.

महिलांचे कार्य, व्यवस्थापन, कलागुण हे पुरुषांच्या तुलनेत जास्त प्रभावशाली असतात हे आता लोकमान्य झाले आहे. दापोलीतील महिलाही मागे नाहीत, येथे नगराध्यक्ष, तहसीलदार, सभापती, नगरसेविका, सरपंच, सदस्य इत्यादी अनेक पदे महिला प्रभावीपणे सांभाळत आहेत.
येथे अनेक महिला कृषी, वैद्यकीय, शासकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्व महिलांप्रती दापोलीकरांना आदर आणि अभिमान आहे.
