काही महिन्यांपासून स्थिरावलेल्या खाद्यतेलांच्या दरात आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे येत्या काही दिवसांत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
रशिया-युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती, इंडोनेशिया, मलेशियातील तेल निर्यातीवरील निर्बंध तसेच दक्षिण अमेरिकेतील हवामान बदलामुळे तेथून आयात होणाऱ्या पाम तेल, सूर्यफूल, सोयाबीन या तेलांची आवक घटण्याची शक्यता आह़े त्यामुळे खाद्यतेलांच्या दरात वाढ होणार असल्याचे सांगितले जाते.
भारतात दरवर्षी २५० लाख टन खाद्यतेलांचा वापर केला जातो. त्यापैकी १६० लाख टन खाद्यतेल परदेशातून आयात केले जाते. युक्रेनमधून सूर्यफुलाच्या तेलाची आयात केली जाते.
रशिया- युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथून होणारी सूर्यफूल तेलाची आयात कमी होणार आहे. इंडोनेशिया, मलेशियात पाम तेलाचे उत्पादन कमी झाल्याने तेथील सरकारने पाम तेलाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत.
ब्राझील, अर्जेटिना या देशांतील हवामानामुळे सोयाबीनच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम खाद्यतेलांच्या आयातीवर होणार असून फेब्रुवारीनंतर पुन्हा खाद्यतेलांचे दर टप्याटप्याने वाढण्याची शक्यता खाद्यतेल व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
उत्तरेकडील राज्यातील थंडी तसेच हिमवृष्टीचा फटका मोहरीच्या लागवडीस बसला आहे. त्यामुळे त्या तेलाच्याही दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
अर्जेटिना, ब्राझील, अमेरिका या देशांमध्ये सोयाबीन तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तेथील हवामान बदलामुळे यंदा सोयाबीनची लागवड कमी झाली आहे.