ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी तातडीनं काय उपाय योजना करता येतील हे सुचवलं आहे. मदत पोहोचायला सुरुवात झाली आहे. पण मदतीचा वेग आणखी वाढला पाहिजे. आपण कल्पना न केलेली हानी कोकणकिनारपट्ट्यात झाली आहे. प्रत्येकानं शक्त ती मदत करणं आवश्यक आहे. मंदार फणसे यांनी केलेलं आवाहन गंभीरपणे घेणं आवश्यक आहे.

त्यांंनी सुचवलेले मुद्दे खालील प्रमाणे :

तातडीने एकूण 200 ते 300 खेड्यांना ठोस मदत हवी आहे. सरकार, सामाजिक संस्था काय करू शकतात?

1) कौलं किंवा पत्रे प्रत्येक गावी अल्प किमतीत किंवा भेट स्वरूपात पाठवू शकता.

2) ताडपत्री आणि प्लास्टिक शिट्स पाठवल्या जाऊ शकतात

3) सरकार ने माड आणि पोफळी ,आंबा आणि काजूच्या पिकांची फळ देण्याची वयोमान शक्यता गृहीत धरून, आर्थिक मदत आणि सोबत नवीन उत्तम रोपे, कलमं लोकांना मोफत उपलब करून द्यावीत.कोकणात अनेक नर्सरी आहेत, त्यांच्या सोबतीने गाव दत्तक आणि लागवडीसाठी निधी घेऊन वाटप करावे

4) खावटीसाठी वृद्ध आणि गरजू कुटुंबांना किमान 3 महीने साठीचा शिधा ,जिन्नस आणि नवीन पांघरूण व्यवस्था करून द्यावी. आणि या सोबत किमान 10 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी.

मंदार फणसे

5) मुळात या बाबी खरं तर सरकारला देणं सोप्या आहेत, पण आता पंचनामे टाइम पास करतील, त्यात राजकारण होईल, कोण कुणाचा असं पाहिलं जाईल आणि या वर प्रशासकीय उदासीनता मोठी असेल. काही करायचं असल्यास पुढील 10 दिवसात एक एक गाव शोधून आपापला वाटा उचलूयात. वेळास, बाणकोट, मंडणगड , माणगाव पट्ट्यात 300 गावांत मोठी हानी आहे, तर पहिल्यांदा तिथे लक्ष द्यायला हवं आहे.

6) पुढील 10 दिवस मदत पुनर्वसन मंत्री ,कोकणात मुक्कामी हलवावेत आणि विशेष GR काढून त्यांना मंत्रालयाशी हॉट लाईन जोडून, सेक्रेटरी पातळीवरच्या अधिकाऱ्याची ,विभागीय उपायुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या शिर्षस्थ अधिकार द्यावेत.

जुने मापदंड मोडून नवे प्रघात पथदर्शी पाडावेत, बागायतीसाठी पुढील काळात कोकणात याचा उपयोग होईल असे काम करायची संधी म्हणून सरकारने याकडे पहावे.