नवी दिल्ली : नीट-यूजी २०२६ परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीप्रकरणी देशभरात सुरू असलेल्या वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळातील आपल्या पदाचा राजीनामा दिला.
कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा हा मोठा विजय मानला जात आहे. राजीनाम्याची घोषणा करताना तरुणांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले की, जंतरमंतर आणि देशभरातील सद्यस्थिती लक्षात घेऊन त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी काम केले असून, मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदर्शी शिक्षण व्यवस्था हाच एका सशक्त राष्ट्राचा पाया असतो, यावर आपला विश्वास असल्याचे ते म्हणाले.
देशातील तरुणांच्या आकांक्षा आणि भावनांचा आदर करत असून तरुण पिढीची स्वप्ने पूर्ण करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेची संधी मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
जंतरमंतरवरील परिस्थितीचा देशविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये, देशाची एकता अबाधित राहावी आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य कायदेशीर गुंतागुंतीत न अडकता त्यांनी अभ्यासावर आणि करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, या विचाराने राजीनामा दिल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पेपरफुटीला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी असलेले नवीन विधेयकही (अँटी पेपर लीक बिल) चर्चेत असून, यात दोषींना १० वर्षे कारावास, १० कोटी रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांत खटल्याचा निकाल लावण्याची कठोर तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, पर्यावरण आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आपले २६ दिवसांचे उपोषण मध्यरात्री सोडले. नीट परीक्षा प्रकरणावरून सीजेपी गेल्या काही दिवसांपासून जंतरमंतरवर आक्रमक आंदोलन करत होती आणि शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता.
सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टी यांच्यात झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर सीजेपी आपल्या मागणीवर ठाम होती. शुक्रवारी सीजेपीच्या शिष्टमंडळाने जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेतली होती व आज पुन्हा चर्चेची फेरी होणार होती, मात्र त्यापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.
या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी हा जनतेचा विजय असल्याचे म्हटले आहे. जर जनता घाबरली नाही आणि सरकारसमोर झुकली नाही, तर कोणाचाही राजीनामा मिळवता येऊ शकतो, असे ते म्हणाले.
मात्र, केवळ राजीनाम्यावर समाधान न मानता या प्रकरणातील पीडित आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी आणि २० तारखेला आंदोलकांवर बळाचा वापर करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, या दोन मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा अभिजित दिपके यांनी दिला आहे.

