दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद जीवन शिक्षण आदर्श शाळा कुंभवे येथे आषाढी एकादशीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी शाळेत विठ्ठल-रखूमाईच्या मूर्तीची स्थापना करून भावपूर्ण पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी दिंडी व भजनाच्या सादरीकरणातून विठुनामाचा गजर केला.

या सोहळ्यात विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी एकत्र येत रिंगण धरून फुगड्यांचा आनंद लुटला, ज्यामुळे शाळेचा संपूर्ण परिसर वारकरीमय झाला होता.

या कार्यक्रमाचे नेटके नियोजन मुख्याध्यापिका ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सुनंदा मळगे, पूनम चौधरी, कोमल मुरुडकर आणि बाबू घाडीगांवकर यांनी केले.