रत्नागिरी: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून २०२६ रोजी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि शाश्वत विकासाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

महाविद्यालयाचे प्राचार्य केतनकुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवला. यासोबतच इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउन, जिल्हा प्रकल्प समन्वयक, UNDP, रत्नागिरी, जलजीविका संस्था, रत्नागिरी आणि लोक कल्प फाऊंडेशन, रत्नागिरी यांनीही या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.

महाविद्यालयीन परिसरात आवळा, बेल, कडूलिंब, कोकम, शेवगा इत्यादी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी लागणारी सर्व रोपे इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे प्रायोजित करण्यात आली होती.

पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून, संपूर्ण परिसर हिरवागार व पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्रात यु एन डी पी, रत्नागिरी आणि जलजीविका यांच्या वतीने पर्यावरण आधारित विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

या खेळांमध्ये मत्स्य अभियांत्रिकीचे विद्यार्थी आणि क्रांती महिला बचत गट शिरगाव, रत्नागिरी येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित आणि निरोगी पर्यावरण जपण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचणार आहे.