दापोली : येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शालेय उपक्रमांतर्गत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी कोकण मर्चंटाइल बँक दापोली येथे नुकतीच क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना बँकेची कार्यप्रणाली आणि आर्थिक व्यवहारांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, या उद्देशाने मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका फैरोजा सावंत यांनी या क्षेत्रभेटीचे योग्य नियोजन केले होते.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बँकेचे शाखा व्यवस्थापक अब्दुल समद ठेणकर यांच्याशी थेट संवाद साधून बँकिंग प्रणालीची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी ठेणकर यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
बँकेत आल्यावर रेशमा जोगीलकर यांच्यासह बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्वागत केले. या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमावेळी प्रशालेचे शिक्षक रिजवान मणियार हेदेखील विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.

