दापोली (प्रतिनिधी) : दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची ६७वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, ९ ऑगस्ट २०२६ रोजी दापोली येथील नवभारत छात्रालयाच्या सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात पार पडली.

या सभेला सुमारे १२५० भागधारक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला अहवाल वर्षात दिवंगत झालेले राजकीय व सामाजिक नेते, शहीद जवान, बँकेचे माजी अध्यक्ष, सभासद आणि ग्राहकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यानंतर विविध क्षेत्रांत विशेष नावलौकिक मिळवलेल्या भागधारकांचा बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यामध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल संदीप राजपुरे, तसेच समाजरत्न आणि समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सुधीर कालेकर व प्रीतम रुके यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर सभेच्या मुख्य कामकाजाला सुरुवात झाली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेला ४ कोटी ६८ लाख ६१ हजार ७०० रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी दिली.

३१ मार्च २०२६ अखेर बँकेच्या एकूण ठेवी ५२६ कोटी ९९ लाख रुपये, तर एकूण कर्जवाटप ३४३ कोटी ६१ लाख रुपये झाले असून बँकेचा एकत्रित व्यवसाय ८७० कोटींच्या पुढे गेला आहे.

बँकेच्या ठेवींमध्ये १६ टक्के वाढ झाल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले. या सभेमध्ये विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देत भागधारकांना ९ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

बँकेने सातत्याने ऑडीट वर्ग ‘अ’ राखला असून, ठेवीदार आणि भागधारकांसाठी अपघात विमा योजना राबवली जात आहे. या आर्थिक वर्षात बँकेने स्वतःच्या उत्पन्नातून ४१.९१ लाख रुपये विमा हप्ता भरला आहे.

तसेच, भविष्यात सभासद व ठेवीदारांचा अपघात विमा अनुक्रमे ३ लाख व ७ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय संचालक मंडळ घेणार असल्याचे जालगावकर यांनी स्पष्ट केले.

विम्याची रक्कम कुटुंबीयांना सुपूर्द करताना जयवंत जालगावकर

रिझर्व्ह बँकेच्या निकषांचे काटेकोरपणे पालन करत बँकेने ‘एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर बिझनेस ऑथोरायझेशन’ हा दर्जा प्राप्त केला आहे.

थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे बँकेचे ढोबळ एनपीए प्रमाण ३.१५ टक्के, तर निव्वळ एनपीए प्रमाण ० टक्के राखण्यात यश आले आहे. बँकेने ५०० कोटींच्या ठेवींचे उद्दिष्टही पूर्ण केले आहे.

बँकिंग नियमन कायद्यातील कलम १० नुसार संचालक मंडळाच्या पात्रतेबाबत पोटनियमांत बदल करणारी दापोली अर्बन बँक देशातील पहिली बँक ठरल्याचा अभिमान जालगावकर यांनी व्यक्त केला.

तसेच, रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार १३ टक्के भांडवल पर्याप्तता प्रमाण राखणे आवश्यक असून बँकेने ते १३.२३ टक्के इतके राखले आहे.

यावेळी सुधीर कालेकर, विकास शेट्ये, अभिमन्यू सोनावणे, जगदीश वामकर, राकेश कोटिया आणि पांडुरंग पावसे यांनी मांडलेल्या सूचनांवर अध्यक्षांनी समाधानकारक खुलासा केला.

या सभेपूर्वी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ चिंतामणी वैजापूरकर यांच्या उपस्थितीत भागधारकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी बँकेच्या आर्थिक सक्षमतेचे कौतुक केले.

तसेच, बँकिंगमधील पदवी मिळवल्याबद्दल बँक कर्मचारी मनोज अनंत वंडकर यांचा सत्कार करण्यात आला.

सभेचे विषयवार कामकाज बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी थोरात यांनी पार पाडले, तर ज्येष्ठ संचालक माधव शेट्ये यांनी आभार मानून सभेची सांगता केली.