रत्नागिरी : भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपणे व उमद्या शास्त्रीय गायकांसाठी व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने आर्ट सर्कल फाउंडेशन आणि सेंटर फॉर रिसर्च अँड प्रमोशन ऑफ इंडियन म्युझिक (CRPIM) यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत विशेष ‘स्वरभास्कर’ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या सातत्यपूर्ण सांगीतिक उपक्रमाचे हे १६ वे वर्ष असून हा कार्यक्रम रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता झाडगाव येथील माधवराव मुळ्ये सभागृहात रंगणार आहे.

यंदाची स्वरभास्कर बैठक सीआरपीआयएमच्या (CRPIM) विशेष सहभागाने होणार आहे. वीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा जपणे आणि त्याचा प्रसार व प्रचार करणे हे आहे.

‘बैठक नेटवर्क’ या उपक्रमाच्या माध्यमातून ही संस्था शास्त्रीय संगीत समीप बैठक परंपरा पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे. या पद्धतीमध्ये कलाकार आणि रसिक यांचा थेट संवाद घडून येत असल्याने शास्त्रीय संगीताचा अधिक सजगपणे आस्वाद घेता येतो.

ही परंपरा जपणे आणि ती वृद्धिंगत करणे याला सीआरपीआयएमने खूप महत्त्व दिले असून याच समान उद्दिष्टाने सुरू झालेल्या स्वरभास्कर बैठकीसाठी यंदा त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

या बैठकीत तरुण आणि होतकरू शास्त्रीय गायक विशारद गुरव, चैतन्य परब आणि नुपूर गाडगीळ हे आपली कला सादर करणार आहेत.

महेश देशपांडे आणि प्रसाद गुळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे शिक्षण घेतलेल्या विशारद याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. संगीत नाटकातून उत्तम गायक-अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केलेला विशारद उत्कृष्ट ऑर्गनवादकदेखील असून आजवर त्याने गायनाप्रमाणेच ऑर्गनवादनासाठीही अनेक पारितोषिके मिळवली आहेत.

रत्नागिरीचा सुपुत्र चैतन्य परब याने आई आणि प्रथम गुरू विनया परब यांच्याकडे गाण्याची प्राथमिक तालीम घेतली. त्यानंतर गेली ११ वर्षे तो जयतीर्थ मेऊंडी यांच्याकडे किराणा घराण्याचे धडे गिरवत आहे. आज रत्नागिरीचे हे दोन्ही तरुण कलाकार महाराष्ट्रभरातील मानाच्या महोत्सवांमध्ये सादरीकरण करत आहेत.

गायिका नुपूर गाडगीळ हिने संगीत विषयात विशारद तसेच एमए पूर्ण केले असून मधुकर गजाननराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्यांची तालीम घेत शास्त्रीय संगीताची बैठक पक्की केली आहे. याशिवाय शुभदा दादरकर, श्रीकांत दादरकर, रामदास कामत, अरविंद पिळगांवकर आणि रजनी जोशी यांच्याकडून तिने नाट्यसंगीताचे धडे गिरवले आहेत.

हे तिन्ही कलाकार आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून त्यांच्याकडून सादर केल्या जाणाऱ्या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील विविध रचना हे या बैठकीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

या सांगीतिक बैठकीस उत्कृष्ट लय व स्वरांची जोड देण्यासाठी रत्नागिरीचे अथर्व आठल्ये हे तबलासाथ आणि चैतन्य पटवर्धन हे संवादिनीसाथ करणार आहेत.

या सर्व कलाकारांच्या समन्वयातून रसिकांना एका अत्यंत समृद्ध आणि सुरेल सांगीतिक अनुभवाची प्रचिती लाभणार आहे. १६ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या बहारदार स्वरभास्कर बैठकीस रत्नागिरीतील सर्व संगीतप्रेमी, रसिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा