रत्नागिरी – गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 90च्या वर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरूवात केल्याने लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

सध्या केवळ वीस टक्केच पर्यटक कोकणामध्ये फिरायला येताना दिसत आहेत. चा राबता आहे. टाळेबंदी झाली तर कुठेतरी अडकून पडू या भितीने पर्यटक इच्छा असूनही बाहेर पडत नाहीत. मुंबई, पुण्यातील पर्यटक घटल्यामुळे पर्यटन व्यावसायातील लाखोची उलाढाल थांबली आहे.

गतवर्षी याच काळात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरवात केली होती. नोव्हेंबरपासून उद्योग, व्यावसाय सुरळीत होऊ लागले. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे तिन महिने कोकणातील पर्यटन स्थळांवरील व्यावसायिकांसाठी दिलासादायक गेले. मात्र मार्च महिन्यात कोरोना महाराष्ट्रात वाढत आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले. शासनही सुरक्षेच्या उपाययोजनांसह कडक निर्बंध घालत आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उतरती कळा सुरु झाली.

दापोलीपासून ते राजापूरपर्यंत सगळीकडेच पर्यटन स्थळांवर शुकशुकाट आहे. मुंबई, पुण्यातील पर्यटक दापोली, गुहागरला सर्वाधिक पसंती देतात. त्यानंतर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील गणपतीपुळेसह अन्य ठिकाणांकडे वळतात. याच मेट्रोसिटीमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे तेथील लोक पर्यटनासाठी बाहेर पडण्याचा बेतच रद्द करत आहेत. लोकांची इच्छा आहे, पण टाळेबंदी अचानक जाहीर झाली तर काय, असा प्रश्न सतावत आहेत. हॉटेल, लॉजिंग चालवणाऱ्यांकडे पर्यटकांकडून विचारणाही होत आहे. प्रत्यक्षात बुकींगला अत्यल्प प्रतिसाद आहे. गणपतीपुळे, दापोलीसारख्या ठिकाणी दर शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक दाखल होतात. यावेळी हा आकडा शेकड्यात येऊन थांबला आहे. गणपतीपुळेत दिवसभरात चारशे माणसे किनाऱ्यावरुन फिरुन गेली असतील असा अंदाज आहे. त्यात बहुतांश पश्चिम महाराष्ट्रातीलच लोकांचा समावेश होता.

दरम्यान, दहावी, बारावीच्या परिक्षांमुळे दरवर्षी कोकणात मार्च महिन्यात पर्यटकांची गर्दी 60 टक्के असते. यंदा ती अवधी 20 टक्केवर आली आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेकांनी ही परिस्थिती निवळू दे यासाठी शिमग्याच्या ठिकाणी साकडे घालण्यास सुरवात केली आहे.