भालचंद्र कानगो यांचे प्रतिपादन : ‘राजकारणातील नैतिकता’ परिसंवादात सहभाग

गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : राजकारणाकडे तुम्ही कसे बघता त्यावर तुमची नैतिकता अवलंबून आहे. अलीकडच्या काळात राजकारण हा शो बिझनेस झाला आहे. त्याला धंदा आणि व्यवहाराचे स्वरूप आले आहे.

काहीतरी मिळवण्यासाठी राजकीय पक्षात गेले पाहिजे, अशी मानसिकता सर्वसामान्य माणसांमध्ये निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो यांनी केले.

प्रगतीशील लेखक संघ (महाराष्ट्र) आणि एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या प्रगतशील साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘राजकारणातील नैतिकता’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या परिसंवादात कानगो यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, संपत देसाई सहभागी झाले होते. कॉम्रेड आर. बी. मोरे विचारमंचावर झालेल्या या परिसंवादाचे अध्यक्षपद विजय चोरमारे यांनी भूषविले.

कानगो पुढे म्हणाले की, अलीकडचे राजकारणी हे राजकारणातून सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता अशा दुष्टचक्रात अडकले आहेत. राजकारणाकडे तुम्ही साधन म्हणून बघता की साध्य म्हणून बघता त्यावर तुमची राजकीय नैतिकता अवलंबून आहे.

अलीकडच्या काळात प्रत्येकजण आपली प्स्वरतिमा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. विकास आणि भ्रष्टाचार यांचा जवळचा संबंध आहे. समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेन हा त्याचाच एक भाग आहे.

जनतेला जात, धर्म, भाषा, प्रांत या प्रश्नांवर भडकवले जाते; मात्र डाव्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते आजही जनतेचे प्रश्न घेऊन संघर्ष करण्याची भूमिका घेतात कारण आज नैतिकता पक्त त्यांच्याकडेच शिल्लक आहे.

आपल्याला जे अनैतिक वाटते त्यावर प्रगतिशी लेखक संघाच्या लेखक, कवींनी भाष्य आवाहन यां वेळी श्री. कानगो यांनी केले.

या परिसंवादाला आमदार उदय सामंत, आमदार भास्कर जाधव यांना आमंत्रित करण्यात आले होते, मात्र ते या परिसंवादाला हजर राहू शकले नाहीत यावर भाष्य करताना आजच्या या परिसंवादाला अनुपस्थित राहून संबंधित राजकारण्यांनी राजकीय नैतिकतेला हरताळ फसल्याचे सिद्ध करून दाखवल्याचे चोरमारे म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “नैतिकता व्यक्तीसापेक्ष बदलत असते. भारतातील संपूर्ण राजकारण हे अनैतिकतेवर अवलंबून आहे. इथे दंगली घडवूनसुद्धा निवडणुका जिंकता येतात, म्हणून काही पक्ष आणि संघटना दंगली भडकावण्याचे काम करतात.

पश्चिम महाराष्ट्रात अफजल खानाच्या वधावरून दंगल भडकवून त्याचा राजकारणासाठी उपयोग केला गेला आणि भारतीय जनता पक्षाने सहा जागा मिळवल्या.

छगन भुजबळ यांनी मंडल आयोगासाठी नव्हे, तर विरोधी पक्षनेतेपद मनोहर जोशी यांच्याकडे गेल्यामुळे शिवसेनेत बंडखोरी करून बाहेर पडले. ”

भारतीय नेत्यांनी जशा आपल्या भूमिका बदलल्या तशाच प्रसार माध्यमांनीही आपल्या भूमिका बदलल्याचे सांगत गेल्या दहा वर्षांतले संपूर्ण राजकारण केवळ अनैतिकतेच्या पायावर उभे आहे.

देशातील सर्वच प्रसारमाध्यमे सरकारच्या दावणीला बांधली गेली आहेत, असे त्यांनी सांगितले.