रत्नागिरी : महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ पुरस्कारासाठी घोषित करण्यात आली आहेत.
यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १० पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थान मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह अन्य नऊ जणांचा समावेश आहे.
गुन्हे तपास आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल दरवर्षी हे मानाचे पदक प्रदान केले जाते.

या वर्षीच्या यादीत विवेक पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन घाग, मारुती हलगी, संदेश चव्हाण आणि अशोक राठोड यांना हे पदक जाहीर झाले आहे.
तसेच पोलीस हवालदार दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे आणि पोपट गव्हाणे यांच्या कामगिरीचीही दखल घेण्यात आली आहे.
नागरी हक्क संरक्षण दलातील मोरेश्वर मयेकर आणि पोलीस शिपाई शीतल पिंजरे यांनाही या सन्मानाने गौरवण्यात येणार आहे.

एकाच वेळी जिल्हयातील दहा जणांना हा बहुमान मिळाल्याने रत्नागिरी पोलीस दलाची मान राज्यात उंचावली आहे. पोलीस महासंचालकांचे हे सन्मानचिन्ह पोलीस सेवेतील प्रतिष्ठेचे मानले जाते.
या यशाबद्दल पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व पदकविजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आगामी काळात एका विशेष सोहळ्यात या सर्वांना पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन अधिकृतपणे सन्मानित केले जाईल.

