खेड: दापोली-खेड रस्ता (रामा-१६२) वरील काळकाई कोंड मशिदीजवळील पुलाच्या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने ऋषिकेश रविंद्र गुजर यांना लेखी पत्र दिले आहे.
पुलाच्या पुनर्बांधणीपूर्वी परिसरातील विद्युत वाहिन्या आणि पाणीपुरवठा नलिकांचे स्थलांतर करणे अनिवार्य असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले असून, यामुळे प्रत्यक्ष काम पावसाळ्यानंतरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऋषिकेश गुजर यांनी या पुलाच्या कामासाठी १ मे २०२६ पासून उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेडच्या उपअभियंत्यांनी ३० एप्रिल रोजी लेखी पत्र पाठवून सद्यस्थितीची माहिती दिली.
दापोली उपविभागाच्या पत्राचा संदर्भ देत विभागाने कळवले आहे की, तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतरच पुलाचे बांधकाम शक्य आहे. पावसाळा सुरू होत असल्याने हे काम आता हाती न घेता पावसाळ्यानंतर प्राधान्याने पूर्ण केले जाईल.
प्रशासनाने लेखी पत्राद्वारे दिलेल्या या आश्वासनावर बोलताना ऋषिकेश गुजर म्हणाले,
“आम्ही पुलाच्या कामासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. आता विभागाने लेखी पत्र देऊन तांत्रिक अडचणी आणि कामाच्या नियोजित वेळेची माहिती दिली आहे. प्रशासनाने दिलेल्या या शब्दाचा मान राखून आणि पावसाळ्यातील अडचणींचा विचार करून आम्ही १ मे रोजीचे उपोषण स्थगित करत आहोत. मात्र, पावसाळा संपताच कोणत्याही परिस्थितीत काम सुरू होणे अपेक्षित आहे.”
या पत्राची प्रत माहितीसाठी दापोलीचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि चिपळूण येथील कार्यकारी अभियंता यांनाही पाठवण्यात आली आहे. प्रशासनाच्या या पत्रामुळे तूर्तास पुलाच्या कामाचा पेच सुटला असून उपोषण मागे घेण्यात आले आहे.

