देवरुख: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात दख्खन गावाच्या हद्दीत एका उताराच्या वळणावर २० हजार लिटर डिझेल वाहून नेणारा टँकर उलटून भीषण अपघात झाला. चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी वेगात व निष्काळजीपणाने चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले असून, याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चालक सुरेश आनंदा पवार (वय ३९, रा. बेडग, सांगली) हा टँकर (क्र. MH-10-CR-5184) घेऊन मिरज येथील इंडियन ऑईल डेपोतून रत्नागिरी एस.टी. महामंडळाच्या डेपोसाठी डिझेलची डिलिव्हरी देण्यासाठी जात होता. २८ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास आंबा घाट उतरत असताना, दख्खन गावच्या हद्दीतील एका तीव्र उताराच्या वळणावर चालकाचा टँकरवरील ताबा सुटला. टँकर रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाल्याने टँकरचे मोठे नुकसान झाले असून, त्यातील डिझेलचीही नासाडी झाली आहे.
या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, टँकर मालक संजय भाऊसो हिप्परकर (रा. शामनगर, कुपवाड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी चालक सुरेश पवार याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे घाटातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. अधिक तपास देवरुख पोलीस करत आहेत.

