रत्नागिरी : कर्नाटक, आसाममधील कॉफीचा मळा आंबा, काजूसह नारळ, पोफळीसाठी प्रसिध्द असलेल्या कोकणातही फुलू शकतो, हे दापोली तालुक्यातील केळशीचे शेतकरी उदय जोशी यांनी दाखवून दिले आहे.
वीस गुंठे जमीनीवर आंतरपिक म्हणून ‘रोबस्टा’ जातीच्या झाडांची लागवड त्यांनी केली आहे. त्याच्या फळापासून चांगल्या दर्जाची कॉफी बनवली जाते.
गेली चार वर्ष ते कॉफीची फळं विक्री करत असून त्यातून दरवर्षी चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न घेतात.
स्ट्रॉबेरीच्या यशस्वी प्रयोगानंतर आता कॉफीच्या लागवडीला चालना देण्याचा पर्याय पुढे येऊ लागला आहे.
दापोली तालुक्यातील केळशी येथील उदय जोशी यांनी 2015 साली कर्नाटक येथून कॉफीची फळं देणाऱ्या रोबस्ट’ या जातीच्या बिया आणल्या.
नारळ, पोफळीच्या बागेत आंतरपिक म्हणून त्यांनी लागवड केली. केळशी गावातील काही घरांच्या परसबागेत लाल रंगाची फळं देणारी झाडं पाहीली होती.
ती कॉफीची असल्याची माहिती मिळाली. कोकणातील जमिनीमध्ये ही झाडे जगु शकतात हे लक्षात आल्यानंतर जोशी यांनी बिया लावल्या.
पहिल्यावर्षी त्यांना 30 किलो बिया मिळाल्या. ओल्या बियांना 140 रुपये दर मिळतो. अनेक शेतकऱ्यांना कॉफीची लागवड करत असल्याची माहिती आहे.
त्यामुळे वेगळं बाजारात जाऊन त्याची विक्रि करावी लागत नाही. जे शेतकरी आणि पर्यटक बागेत येतात त्यांच्याकडेच विक्री ते करतात.
यामध्ये सर्वाधिक सातारा, सांगली, कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. चार वर्षात झाडांची संख्या वाढली असून वीस गुंठ्यांवर 130 झाडे आहेत.
वर्षभरात 300 किलो बिया मिळतात. त्यामधून चाळीस हजार रुपये उत्पन्न येते. याची बी सुखवली आणि प्रक्रिया केली तर किलोचा दर सहाशेपेक्षा अधिक मिळू शकतो.
या झाडांना उनाड गुरे, वानर किंवा माकड, डुक्कर, वटुवाघूळ यांचा कोणताही त्रास होत नाही तर किडरोगांचा प्रादुर्भावही कमी आहे.
सप्टेंबरपासून काढणीला आरंभ
तीन दिवसांनी एकदा ठिबक पध्दतीने वीस मिनिटे पाणी दिले जाते. जुन महिन्यात फुले यायला सुरवात होते. कुंदाच्या फुलांप्रमाणे ते झुपके असतात.
त्याचे फळात रुपांतर होऊन परिपक्व होण्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो. त्या फळांच्या बियांची पावडर केली जाते. त्यावर प्रक्रिया केली तर उत्कृष्ट कॉफी होते.