गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

गुहागर पंचायत समितीत शिस्तीचा बडगा; कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

गुहागर पंचायत समितीत शिस्तीचा बडगा; कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

गुहागर : जनतेची कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांसमोर कर्मचारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र यापुढे दिसता कामा नये.

कार्यालयीन वेळेत मोबाईलचा वापर टाळून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कामकाज करावे, अशा स्पष्ट सूचना गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती नीलेश सुर्वे यांनी मासिक सभेत दिल्या.

सभापती प्रणव पोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत प्रशासकीय कामकाजात शिस्त आणि सुसूत्रता आणण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्धार करण्यात आला.

तालुक्यातील नागरिक विविध समस्या घेऊन लोकप्रतिनिधींकडे येत असल्याने प्रशासकीय परिपत्रके आणि शासनाच्या निर्णयांमधील बदलांची माहिती लोकप्रतिनिधींना असणे आवश्यक असल्याचे सभेत नमूद करण्यात आले.

मात्र, पंचायत समितीतील अंतर्गत कामकाज आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील चर्चेची माहिती बाहेर कशी जाते, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रकारचे वर्तन यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.

दरम्यान, या सभेला महावितरण आणि दूरसंचार विभागाचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने या दोन्ही विभागांशी संबंधित प्रश्नांचा निपटारा होऊ शकला नाही.

सभेत ग्रामपंचायतींकडील १५ व्या वित्त आयोगाच्या खर्च आणि शिल्लक निधीची सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार या निधीच्या व्यवहारासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची खाती आयसीआयसीआय बँकेच्या खरवते शाखेत उघडण्यात आली आहेत. मात्र, या शाखेकडून आवश्यक सहकार्य मिळत नसल्याची तक्रार सभेत मांडण्यात आली. दर आठवड्याला बँकेचा एक कर्मचारी पंचायत समितीत उपलब्ध राहून अडचणी सोडवेल, या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने खरवते शाखेतील सर्व खाती बंद करून सहकार्य करणाऱ्या अन्य बँकेच्या शाखेत उघडण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

मनरेगा कामांचा आढावा घेताना नेटवर्क नसलेल्या भागातील कामांचे मॅपिंग कसे करायचे, हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच पूर्ण झालेल्या कामांची मस्टर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक खातेबदल करणे, कर्मचाऱ्यांच्या जागा निश्चित करणे आणि कामचुकार कर्मचाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्या बदलीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबवण्याचा निर्धारही सभेत करण्यात आला. या सभेला उपसभापती नीलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

English Title: Guhagar Panchayat Samiti Cracks Down on Office Discipline; Bans Mobile Use During Working Hours

Tags: Guhagar News, Ratnagiri News, Guhagar Panchayat Samiti, Pranav Polekar, Nilesh Surve, 15th Finance Commission, ICICI Bank Kharavate, MGNREGA, Maharashtra Local News, Panchayat Samiti Meeting

15th Finance Commission, Guhagar News, Guhagar Panchayat Samiti, ICICI Bank Kharavate, Maharashtra Local News, MGNREGA, Nilesh Surve, Panchayat Samiti Meeting, Pranav polekar, ratnagiri news

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *