दापोली : दापोली क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दापोली आंतरशालेय अजिंक्यपद २०२६’ या १७ वर्षांखालील टी-१० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत दापोली येथील ए. जी. हायस्कूलच्या संघाने अष्टपैलू आणि दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत ओणणवसे येथील सरस्वती विद्यामंदिर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

शालेय स्तरावरील क्रिकेटपटूंना दर्जेदार व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दोन गटांमध्ये विभागण्यात आलेल्या या स्पर्धेत दापोली तालुक्यातील सहा नामवंत शालेय संघांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये गट ‘अ’ मध्ये ए. जी. हायस्कूल दापोली, यु. ए. दळवी इंग्लिश मीडियम स्कूल दापोली आणि संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल दापोली (ब्लू) या संघांचा समावेश होता.

तर गट ‘ब’ मध्ये सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल दापोली, संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल दापोली (रेड) आणि सरस्वती विद्यामंदिर ओणणवसे या संघांनी आपले कौशल्य पणाला लावले. साखळी फेरीपासून ते अंतिम सामन्यापर्यंत सर्वच संघांनी उत्कृष्ट खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले.
स्पर्धेतील अंतिम सामन्यात निर्णायक आणि उत्कृष्ट खेळ करणाऱ्या ए. जी. हायस्कूलच्या ओम चांदे याला अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सांघिक विजेतेपदासोबतच वैयक्तिक पारितोषिकांमध्येही ए. जी. हायस्कूलच्या खेळाडूंनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सर्वज्ञ वेल्हाळ याने मालिकावीर (प्लेअर ऑफ द टूर्नामेंट) हा मानाचा किताब पटकावला. अनिरुद्ध पवार याने उत्कृष्ट फलंदाज, तर अभिषेक रेवाळे याने उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बहुमान मिळवला.
उपविजेत्या सरस्वती विद्यामंदिर ओणणवसे संघाचा खेळाडू रोहित कांबळे याची चपळ क्षेत्ररक्षणासाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवड करण्यात आली.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण आणि समारोप सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये साधना बोत्रे, राहुल मंडलिक, विलास मोरे, शमशाद खान, अविनाश पाटील, प्रथमेश दाभोळे आणि माजिद चिकटे यांनी उपस्थित राहून युवा खेळाडूंचा उत्साह वाढवला.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये लेदर बॉल क्रिकेटची आवड निर्माण व्हावी आणि तालुक्यातून दर्जेदार खेळाडू घडावेत, यासाठी ही स्पर्धा यापुढेही दरवर्षी अशाच भव्य स्वरूपात आणि उत्साहात आयोजित केली जाईल, अशी घोषणा दापोली क्रीडा मंडळाच्या वतीने यावेळी करण्यात आली.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी दापोली क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेश घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेखर आग्रे, महेंद्र शिंदे, जतीन साळगावकर, समीर झगडे, सचिन महाडिक, अमित बिंद, अमित इंदुलकर, प्रसाद शिर्के, श्रेयस खटावकर, श्रेयस मेहेंदळे, सुभान साहिबोले, कैफ बुरोंडकर, मकबूल बुरोंडकर, नवाज फकी, आशिष घाणेकर, शयान पडलेकर, रूपेश साठे, मनोज बक्कर, सूरज खेडेकर, पराग खटावकर, संदेश निवळकर, विकास भारंबे, नितेश मोहिते आणि सचिन मुरुडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षक यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल आयोजकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply