शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

कोकणात ‘हायरॉक्स’ची मुहूर्तमेढ; प्रसाद देवस्थळी आणि अंकिता प्रभू-पाटकर यांची ऐतिहासिक कामगिरी

कोकणात ‘हायरॉक्स’ची मुहूर्तमेढ; प्रसाद देवस्थळी आणि अंकिता प्रभू-पाटकर यांची ऐतिहासिक कामगिरी

रत्नागिरी : जागतिक स्तरावर अत्यंत आव्हानात्मक फिटनेस स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘हायरॉक्स’ (HYROX) इंटरनॅशनल स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी आपली ऐतिहासिक छाप उमटवली आहे.

गुजरातमध्ये यावर्षी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन व गणपतीपुळे अल्ट्राचे आयोजक प्रसाद देवस्थळी आणि ‘फिटनेस मंत्रा’च्या संचालिका व देशपातळीवरील प्रसिद्ध झुंबा प्रशिक्षक अंकिता प्रभू-पाटकर यांनी यशस्वीरीत्या स्पर्धा पूर्ण केली.

प्रसाद देवस्थळी यांनी २ तास १९ मिनिटे, तर अंकिता प्रभू-पाटकर यांनी २ तास ३६ मिनिटे इतक्या वेळेत ही स्पर्धा पूर्ण करत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले पुरुष आणि पहिली महिला ‘हायरॉक्स’ स्पर्धक होण्याचा मान मिळवला आहे.

विशेष म्हणजे, कोकणात उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसामग्रीत आणि अवघ्या ४५ दिवसांच्या तयारीनिशी दोघांनी हे यश संपादन केले आहे.

या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे रत्नागिरीमध्ये किंवा एकाच जिममध्ये उपलब्ध नसल्याने दोघांनी एआयएम फिटनेस जिम (AIM Fitness Gym) आणि रिफिट जिम (ReFit Gym) येथे समन्वय साधून सराव केला.

या तयारीसाठी रिफिट जिमचे रझीन आणि एआयएम फिटनेसचे अमोल जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले, ज्याबद्दल दोघांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

आपल्या अनुभवाबद्दल बोलताना देवस्थळी आणि प्रभू-पाटकर यांनी सांगितले की, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि त्याच्या प्रॅक्टिस रनमुळे धावण्याचा भाग तुलनेने सोपा गेला, मात्र विविध वर्कआउट्स पूर्ण करणे आणि उपलब्ध साधने व प्रत्यक्ष हायरॉक्स उपकरणांमधील फरक समजून घेणे हे मोठे आव्हान होते.

सर्व उपकरणे उपलब्ध झाल्यावरच अशा स्पर्धांचा विचार करू अशी मानसिकता न ठेवता, कोकणातील महिला आणि पुरुषांनी आपल्या मेहनतीच्या बळावर अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या स्पर्धेतून केवळ फिटनेसच नाही, तर अवघ्या दीड ते दोन एकर परिसरात हजारो खेळाडूंचे कोणताही गोंधळ न होता केलेले अचूक नियोजन आणि इव्हेंट मॅनेजमेंटचे धडेही शिकायला मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आगामी काळात रत्नागिरी आणि कोकणातील अधिकाधिक खेळाडूंनी अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिटनेस स्पर्धांमध्ये सहभागी होऊन जिल्ह्याचा ठसा उमटवावा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी कोकणातील तसेच राज्यभरातील धावपटूंना आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही केले.

रत्नागिरी येथे ३ जानेवारी २०२७ रोजी चौथ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून, त्यात ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अंतराच्या शर्यती होणार आहेत. तसेच २८ मार्च २०२७ रोजी होणाऱ्या गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये २८ किमी, ४२ किमी आणि ५६ किमी अंतरांची आव्हाने असतील.

कोकणचा निसर्ग आणि समुद्रकिनाऱ्यांवर धावण्याचा अनुभव घेण्यासाठी जास्तीत जास्त धावपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल रत्नागिरीतील क्रीडा, फिटनेस आणि सामाजिक क्षेत्रातून दोघांचेही सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Ankita Prabhu-Patkar, Fitness News, Ganpatipule Ultra Marathon, Gujarat HYROX, HYROX International, Konkan Coastal Half Marathon, Konkan Sports, Maharashtra Sports, Prasad Devasthali, ratnagiri news

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *