पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) कारभारात मोठी उलथापालथ झाली असून अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.
या घडामोडीनंतर परिषदेच्या नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला असून अध्यक्षपदी सुनील महाजन, प्रमुख कार्यवाहपदी राजन लाखे आणि कोषाध्यक्षपदी उन्मेष गायधनी यांची निवड करण्यात आली आहे.
२८ नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या अविश्वास ठरावावर सविस्तर चर्चा होऊन तो मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे राज्याच्या साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मसापच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप घेत कार्यकारी मंडळाने २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत अविश्वास ठराव मांडला होता.
या ठरावावर स्थानिक कार्यवाह आणि जिल्हा प्रतिनिधी अशा एकूण २१ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून नाराजीचा सूर होता.
प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून कार्यकारी मंडळाच्या सदस्यांशी योग्य संवाद साधला जात नसल्याचा तसेच कार्यकारी मंडळाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.
यासोबतच आर्थिक व्यवहारांतील पारदर्शकतेचा अभाव आणि नांदी संमेलनांच्या आयोजनातील अनियमितता हे मुद्देही उपस्थित करण्यात आले होते. या सर्व कारणांमुळे वाढलेल्या नाराजीचे रूपांतर अखेर अविश्वास ठरावात झाले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आजवरच्या इतिहासात प्रमुख पदाधिकाऱ्यांविरोधात अशा प्रकारे अविश्वास ठराव मांडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.
आगामी शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपले असताना मसापमध्ये हा मोठा नेतृत्वबदल झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर परिषदेतील नेतृत्व बदलल्याने साहित्य वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, मसापच्या कार्यकारी मंडळाची पुढील बैठक १३ डिसेंबर रोजी होणार असून या बैठकीत पुढील कामकाजाबाबत काय निर्णय घेतले जातात आणि शंभरावे साहित्य संमेलन नव्या नेतृत्वाखाली कसे पार पडते, याकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply