-प्रशांत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी
रत्नागिरी (9823199466)


पृथ्वीवर सध्या सर्वच ठिकाणी कोरोनामय वातावरण आहे. आरोग्यावर परिणाम करणाऱ्या विषाणूच्या उद्रेकाचा परिणाम आहे. याला रोखण्यासाठी सर्वच देशात प्रयत्न सुरु आहेत. सर्व टिव्ही वाहिन्यांवर सध्या कोरोनाची आकडेवारी शिवाय दुसरं काही विशेष नाही. मात्र येत्या 21 जून रोजी एका अनोख्या खगोलीय घटनेची घटीका आहे. विज्ञानप्रेमींना अभ्यासाचा आणि सर्वांच्या कुतूहलाचा विषय या निमित्तानं दिसणार आहे.

या ग्रहणाला आसमंताच्या रंगमंचावर रंगणारं छाया-प्रकाश नाटय असं म्हणता येईल. चालू शतकातील हे सर्वाधित काळ चालणारं सूर्यग्रहण कंकणाकृती प्रकारातलं आहे. ऑस्ट्रोलिया, आफ्रीका, युरोपचा काही भाग यासह भारतातही काही ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे. अर्थात मान्सूनमुळं आभाळात ढंगाची दाटी असल्यास सर्व खगोलप्रेमींची निराशा होण्याचीही शक्यता दाट आहे.

कंकणाकृती ग्रहण म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्यावर चंद्रामुळे सूर्याचा जवळपास सर्व भाग झाकला जातो आणि केवळ बांगडीच्या आकराची अर्थात कंकण आकाराची सूर्याची प्रभा कडेने डोकावताना दिसते. सुर्याला येणारी ही स्थिती खूप मोहक दृश्य निर्माण करणारी असते.

हे ग्रहण आफ्रिकेतील कांगोमध्ये सर्वप्रथम दिसणार आहे. ज्याला स्पर्श बिंदू म्हणतात त्यानंतरचा याचा प्रवास इथिओपिआ, येमेन, सौदी अरेबिया, हिंद महासागर, पाकिस्तान मार्गे भारतात सर्व प्रथम राजस्थानात प्रवेश असा आहे. पुढे याचा प्रवास तिबेट, चीनहून प्रशांत महासागरात ते संपेल त्यापूर्वी ऑस्ट्रेलियातून देखील या नाट्याचा शेवटचा अंक बघता येईल.

सूर्याची आभा झाकली गेल्यानं भरदिवसा अंधार अर्थात रात्र झाल्याचा फिल देणारी ही घटना आहे. 1994 नंतर ज्यांचा जन्म झाला अशा सर्वांसाठी हा पहिला ग्रहणानुभव असेल कारण यापूर्वी अशाप्रकारचं ग्रहण 24 ऑक्टोबर 1995 रोजी झालं होतं.

ग्रहण काळात सूर्य किरण वक्री होतात त्यामुळे थेट डोळयांनी ग्रहण बघण डोळयांसाठी हानीकारक आहे. यासाठी ग्रहणचष्मा सर्वोत्तम उपाय आहे. काळया शिलच्या मदतीने टेलिस्कोप, ऑप्टीकल कॅमेरा किंवा अगदी साधी घरातील चाळणी, झाऱ्या यांच्या सहाय्याने याची प्रतिमा जमिनीवर किंवा कागदावर घेऊन बघणं असे अनेक पर्याय सांगता येतील. शतकातल्या या ग्रहणाच्या निमित्तानं आकाशात रंगणारं हे नाटय सर्वांना एक पर्वणीच आहे.