माझे तेव्हा कॉलेज सुरु होते. मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात आलेला नव्हतो तेव्हाची गोष्ट… साधारण तीसेक वर्षांपूर्वीची असेल… मी आणि Vinay Paranjape रत्नागिरीतील टिळक स्मारक ग्रंथालयात Shrikrishna Sabane गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा सहज विषय पत्रकार आणि पत्रकारीतेकडे वळला. काही नावे चर्चेत आली त्यावेळी जिल्हा पातळीवर काम करताना स्थानिक वर्तमानपत्रातील संपादकीय विभागात ज्यांचा सन्मानाने उल्लेख करता येतील असे कोण हे बोलता बोलता या दोघांकडून पहिले नाव समोर आले ते शिरीष दामले.

तेव्हा हे नाव माझ्या पहिल्यांदा कानावर पडले. त्यानंतर १९९४ मध्ये मी बेळगाव तरुण भारतच्या रत्नागिरी आवृत्तीत काम सुरु केले होते. थोड्याच दिवसांत मी माझा मित्र अनिल जोशीमुळे रत्नागिरी टाईम्सला गेलो. तिथे शिरीष मला सिनीअर म्हणून खऱ्या अर्थाने भेटला.

त्याआधी आम्ही काही जणांनी त्या वयाची हौस म्हणून स्थापन केलेल्या साहित्य कला साधना या संस्थेच्या बातम्या घेउन जायचो तेव्हा प्रदीप कुलकर्णी बरोबर शिरीष भेटायचाच, पण तो एक वेगळा धागा. प्रत्यक्ष काम एकत्र करण्याचा हा विषय वेगळा.

सतत चेहर्यावर हास्य, केस अगदी कायम डाेक्याबराेबरच रहातील अशीच स्टाईल( हेअर कटिंगचे पैस पुरेपूर वसूल हाेतील ही “एकांरांती काे” विचारसरणी यामागे नसावी, असे मी जेवढा शिरीषला आेळखताे त्यावरुन तरी वाटते!), कधीही इनशर्टमध्ये न वावरणारा, कीतीही दीर्घकाळानेे भेट झाली तरी मधली गॅप न जाणवता गप्पा सुरु करण्याचा स्वभाव आणि चहाला गेल्यावर चहा संपल्यावर आणि गप्पा आवरत्या घेतल्यावर पैसे द्यायला काउंटरपाशी आपणहून ठरवून आधी जाणारा असा शिरीष.

स्वतः “काे” असला तरी याबाबत वाद रंगवताना – बायकाे “क” असल्यामुळे का माहित नाही पण – फारसे टाेक काढून न बाेलणारा आणि कधीही गप्पांची मैफील नानू पाटणकर या अगदी घरगुती मित्राचा उल्लेख केल्याशिवाय न संपवणारा शिरीष.

जेव्हा पत्रकारीता अनेक अर्थाने रंगीत संगीत व्हायला सुरुवात झाली होती अगदीे तेव्हाचा तो काळ. आणि हा काळ सुरु होईपऱ्यंत शिरीषने मला वाटते दशकभर पत्रकारीतेत घालवलेला होता. त्यामुळे शिरीष तसे म्हटले तर त्या आधीच्या पत्रकारितेच्या संस्कारातला. म्हणजे हे मी काळ म्हणून जसे म्हणतो तसे व्यक्तिमत्व म्हणूनही.

शिरीष ऑफिसला येताना त्याच्या सोबत इंडियन एक्स्प्रेस काखेत गुंडाळी केलेला हमखास असायचाच. आणि आठवडा अखेरीस स्पोर्टस्टारचा अंकही नक्की. दुपारी बारा -साडेबाराला काम सुरू व्हायचे त्याचे. आम्ही बाकी सहकारी साधारणपणे चारच्या दरम्यान यायचो. तोपर्यंत शिरीषला डेस्कला गप्पा नाहीतर वादविवाद होतील असा एखादा विषय रोजच्या दैनिकांत मिळालेला असायचा. आल्यावर तो विषय पुढे यायचा. त्यात मी काहीतरी कलाकारी अस्वस्थता पाचवीली पुजलेला असा आणि डाव्या विचारसरणीला अधिक मानणारा, अनिल कायम प्रोफेशनलिझम वगैरे गोष्टी करणारा…अरे न्यूयॉर्क टाईम्समध्ये तुला सांगतो ना…असे काही तरी वेगळ्याच विश्वाच्या गोष्टी तोंडावर फेकत अँग्रेसीव्हली मुद्दा मांडणारा…

प्रदीप तेव्हापासूनच त्याच्या त्या एका हाताची मूठ करायची आणि त्या बोटांवर दुसऱ्या हाताच्या बोटे टिचकी सारखी वाजवत हिंदुत्ववादी आणि अर्थात प्रो बीजेपी अशी बाजू लढवणारा. शिरीष अगदी सरळ सरळ खांग्रेसी नसला तरी काहीसा मध्यममार्गी विचारसरणी मानणारा आणि धर्मवाद्यांच्या विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेऊन ते एक्स्पोज करणारा किंवा काही वेळा अगदी खिल्ली उ़डवणे म्हटले तरी चालेल अशी टिप्पणी करणारा. यातून मग पुढे अनेकदा एकमेक कशावर कसे व्यक्त होऊ याचाही अंदाज येण्याईतपत एकमेकांना सरावलो. मग अशा गप्पा कधी कधी वेगळ्या टोन मध्ये गेल्या तर शिरीष त्यावेळी अगदी elderly भूमिका घेऊन, “जाऊ दे, चल चहा मारुन येउ,” असे म्हणून divert करायचा आणि मग हसत खेळत चहा व्हायचा. यामागे त्याचा हेतू असा असायचा की, या वादात व्यक्तिगत कटूपणा येऊ नये.

हे तंत्र शिरीष कायम त्याच्या माझ्याच नव्हे तर प्रत्येक गाेतावळ्यातला शिरीष नात्यात पाळत आलेला मला दिसला. मुळात शिरीष हा कायम गोतावळ्यातला माणूस. म्हणजे त्याला फोन केला की त्याची सुरुवातच मुळी अशी होते, “अरे ती अमकी अमकी आहे ना तिचा फोन होता ..असा असा प्रॉब्लेम झालेला त्यांच्याकडे…मग तिथे गेलो आणि मग अडकलो….तिथून बाहेर पडेपर्यंत एवढे वाजले…!” नाहीतर, “अरे तो हा नाही का..त्याच्याकडे ते असे असे झाले, मग जायला लागले मला.” या “अमकी अमकी” आणि “तो हा नाही का” या रेंजमध्ये मग कुठल्या जवळच्या, लांबच्या वहिनीच्या नात्यातल्यांचा नाहीतर भावाच्या सासरच्यांच्या लांबच्या नात्यांतल्यांचा नाहीतर मग शिरीषला कुणी elderly भूमिका अगदी त्याचे / तिचे लग्न ठरवण्यापासून घ्यायला लावणाऱ्या आणखी कुणी आेळखीतल्याचा समावेश असतो. आणि मुख्य म्हणजे असा काेणाकडील काैटुंबिक साेहळा असाे अथवा तिढा, शिरीष तिथे असणार ताे एक भरवशाचा आधार वाटेल असा ! म्हणजे high moral हा याचा स्थायीभाव आणि एखाद्याशी विचारांचा ट्रॅक जुळणारा नसला तरी त्याच्या बाबतीत काही भूमिका घ्यायची झाली तर शिरीषच्या बाबतीत अगदी टाेकाच्या विश्वासाने सांगू शकताे की ताे त्याही माणसाच्या बाबतीत अशी high moral ठरेल अशीच भूमिका घेणार.


तपशीलात जाऊन बोलायचे हा शिरीषचा स्थायीभाव. मग ताे बातमीत एखादा जास्तीचा भाग आणायचा विषय असाे, तुम्ही विचारलेल्या एखाद्या सल्ल्याबाबत असो नाहीतर सुनील गावस्कर अथवा चॅपेलच्या कॉमेंट्रीच्या शैलीबाबत काही सांगायचे असाे, कपिलच्या फाॅलाे थ्रूबाबत असाे नाहीतर एखाद्या चंदेरी दुनियेतील कपूर घराण्यातल्या पुढच्या मागच्या पिढीबाबत आणि वारशाबाबत असाे भारतीय राजकारणातील वाटा वळणे असाेत नाही तर रत्नांग्रीतील काही स्थानिक विषय असाे… ही यादी तशी बरीच माेठी हाेईल पण या सगळ्यात शिरीष ताे चेंडू सगळीकडून फिरवून स्वतः बघणार आणि तुम्हालाही चेंडूचा न दिसणारा भाग तुमच्यासमाेर आणणार.

शिरीषने मनावर घेतले नाही म्हणूया किंवा त्याच्या ते रक्तात नाही समजूया, पण व्यावसायिकता अंगी बाळगून पत्रकारीतेच्या अधिक विस्तारलेल्या परीघात आणि माेठ्या शहरात जाऊन स्वतःला सिध्द करण्याचा विचार त्याने कधी केला नाही. यात ताे अल्पसंतुष्ट हाेता असे नव्हे, पण कशासाठी हे सगळे? आहे हे ठीक आहे, असा विचार. आणि त्यापेक्षा व्यक्तिमत्वात आडवी वाढ हाेण्यासाठी स्थान महात्म्य खरेच आवश्यक असते का ? असा त्याचा अगदी बेसिक प्रश्न. ताे अर्थात बराेबरही आहे.

ज्येष्ठ म्हणून अनुभवाचे बाेल सांगताना आणि सुनावताना सुध्दा मित्रत्वाचा पैलूच अधिक पुढे राहिल आणि सल्ला कर्कश हाेणार नाही याचे भान ठेवणारा शिरीष आजही चाळीशीच्या आतला असताे तसा उत्साह राखून असताे. माझ्या त्याच्या वयात जवळजवळ अकरा वर्षांचे अंतर. तरीही हे अंतर शिरीषच्याच वागण्याच्या विशिष्ट शैलीमुळे कधी आड आले नाही त्यामुळेच मी काल त्याला साठीच्या शुभेच्छा देताना म्हटले, ” बायकाेला आता वयाच्या विशिष्ट आकड्यावरुन टाेमणा मारण्याचा टप्पा तू गाठलास त्याबद्दल अभिनंदन!”

– श्रीपाद आठल्ये, रत्नागिरी