रत्नागिरी : शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरात पहाटेच्या सुमारास उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला अज्ञात इसमाने आग लावल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
वाहन पेटवण्यापूर्वी संबंधित इसमाने गाडीच्या काचा फोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या भीषण आगीमुळे चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ही घटना घडल्यानंतर संशयित इसम तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, आठवडा बाजार परिसरात एक चारचाकी वाहन उभे करण्यात आले होते.
पहाटेच्या सुमारास या वाहनाजवळ एक संशयित इसम आला आणि त्याने आधी वाहनाच्या काचा फोडल्या. त्यानंतर गाडीला आग लावून पोबारा केला.
काही क्षणांतच या वाहनाने पेट घेतला. आगीच्या तीव्र ज्वाळा आणि धुराचेलोट पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलिसांना संपर्क साधला. माहिती मिलतेच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
परंतु, तोपर्यंत आग विझवण्याच्या प्रयत्नात वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, आठवडा बाजार परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.
वाहनाला नेमकी कशामुळे आग लावण्यात आली आणि यामागील संशयिताचा हेतू काय होता, याचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. अज्ञात इसमाची ओळख पटवून त्याला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.

