
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी लिहिलेल्या ‘इन्विजनिंग इंडिया’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये दिमाखात प्रकाशन करण्यात आले.
२०२७ सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा रोडमॅप या पुस्तकात मांडण्यात आला असून, या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.
या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी पद्मविभूषण एम. एम. शर्मा, गोदरेज आर्काइव्हज कौन्सिलच्या अध्यक्षा डॉ. फिरोजा गोदरेज, पद्मश्री कुमार केतकर, रिलायंस इनोव्हेशन लीडरशिप सेंटरचे प्रमुख सुशील बोर्डे आणि पाशा पटेल यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.
या पुस्तकाच्या माध्यमातून आगामी काळातील भारताच्या विकासाची नेमकी दिशा स्पष्ट करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना एम. एम. शर्मा यांनी मूलभूत संशोधनावर भर दिला. देशातील फार्मा, पेट्रोकेमिकल आणि खत उद्योगांना दिशा देण्यासाठी हे पुस्तक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्र आज महिला वैज्ञानिकांच्या बाबतीत आघाडीवर असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुस्तकाच्या डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन सुशील बोर्डे यांच्या हस्ते झाले. संजय देशमुख हे भूगोल, वनस्पतिशास्त्र, पर्यावरण विज्ञान आणि बायोटेक्नॉलॉजी या विषयांचे गाढे अभ्यासक असून, त्यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे भविष्यातील भारताची ‘डॉक्युमेंटरी’ असल्याचे गौरवद्गार बोर्डे यांनी काढले.
डॉ. फिरोजा गोदरेज यांनी संजय देशमुख यांच्या लेखनाचे कौतुक करताना सांगितले की, हे पुस्तक केवळ समाज आणि सरकारसाठीच नाही, तर संस्थात्मक पातळीवर संवाद वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरेल.
पर्यावरण संरक्षण आणि विकास यांचा समतोल कसा साधावा, याचा आदर्श या पुस्तकात पाहायला मिळतो. विशेषतः हवामान बदल आणि २०२७ चे ‘विकसित भारत’ लक्ष्य गाठण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी या पुस्तकाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, हे पुस्तक केवळ अभ्यासकांसाठी नसून देशातील धोरणकर्ते, नोकरशहा आणि पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विद्यापीठांना संशोधनासाठी अधिक निधी मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संजय देशमुख यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले. देशाच्या विकासामध्ये कृषी विद्यापीठांची संख्या वाढवणे आणि समाजातील सर्व स्तरांतील लोकांचे योगदान असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. विविध विचारधारा असूनही देशहितासाठी एकत्र येणे हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर आणि मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनीही डिजिटल संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिन्स ग्रोव्हर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवानी धुरी यांनी मानले.

Leave a Reply