दापोली शिक्षण संस्था संचालित ए. जी. हायस्कूलची म. ल. करमरकर भागशाळा उंबर्ले येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पालक सभा उत्साहात पार पडली.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.

या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या श्रुती संतोष झाटे हिला मेघना माधव चितळे यांच्याकडून मंगला मधुसूदन करमरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रोख रक्कम, तसेच संचालिका स्मिता रमेश सुर्वे, दिवंगत भिकाजी शंकर साठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केदार साठे आणि मधुसूदन करमरकर यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात आले. द्वितीय क्रमांक मिळवलेल्या वेदांत नरेश पांढरे याला संचालिका स्मिता रमेश सुर्वे, केदार साठे आणि मधुसूदन करमरकर यांच्याकडून द्वितीय पारितोषिक आणि रोख रक्कम देण्यात आली.

तसेच तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या प्रेम प्रवीण तांबे यालाही संचालिका स्मिता रमेश सुर्वे, केदार साठे आणि मधुसूदन करमरकर यांच्याकडून तृतीय पारितोषिक आणि रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ शिक्षक डी. आर. जाधव यांनी प्रास्ताविक करून पालक सभेचा उद्देश स्पष्ट केला. मुख्याध्यापक शरद कांबळे यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि पालकांची आपल्या पाल्यांबाबत असणारी जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संचालिका स्मिता सुर्वे यांनी उपस्थित पालकांना बालकांचे आरोग्य तसेच वाढत्या मोबाईल वापराबाबत जागरूक राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये रवींद्र कालेकर यांनी पालकांना मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेण्याचे, नियमित शाळेशी संपर्क ठेवण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन, शिस्त आणि संस्कार रुजवण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन राणे यांनी केले, तर आभार शीतल पाडळकर यांनी मानले.