खेड : शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ते मिळणे हा त्यांचा हक्क असून सर्व विभागांनी समन्वय ठेवून रस्त्यांवरील अतिक्रमणे तात्काळ दूर करावीत आणि रस्त्यांचे बळकटीकरण करावे, असे स्पष्ट निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत.

खेड येथील शासकीय विश्रामगृहात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना बारमाही आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील शेत-पाणंद रस्त्यांची सद्यस्थिती, रस्त्यांवरील अतिक्रमणे, रस्त्यांचे बळकटीकरण तसेच प्रलंबित कामांना गती देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी उपस्थित नागरिकांच्या विविध समस्या व निवेदने स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे कडक निर्देश कदम यांनी दिले.
योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय राखावा आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून विकासकामांना गती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.

या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला प्रांताधिकारी विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, किशोरभाई देसाई, अण्णासाहेब कदम, सचिन धाडवे, आफिया पालेकर, उन्मेष राजे यांच्यासह खेड नगरपरिषदेचे पदाधिकारी, तिन्ही तालुक्यांतील लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, भूमी अभिलेख विभाग, महसूल विभाग आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


