खेड: राज्यातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असून, एकही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे महसूल, गृह (शहरे), ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. खेड नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के आरक्षित निधीतून थेट आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम आणि कुंदन सातपुते उपस्थित होते.

दिव्यांगांच्या अडचणींवर प्रकाश टाकताना योगेश कदम म्हणाले की, दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, मात्र अनेक पात्र लाभार्थ्यांकडे यूडीआयडी प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ घेता येत नाही.
ही अडचण दूर करण्यासाठी दिव्यांगांना जागेवरच यूडीआयडी प्रमाणपत्र मिळावे, याकरिता विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
खेड नगर परिषदेने यावर्षी दिव्यांग बांधवांना थेट आर्थिक मदत देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. दिव्यांगांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर शासनाच्या इतर सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही नगर परिषद सातत्याने पुढाकार घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
खेड नगर परिषदेच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे स्थानिक दिव्यांग बांधवांना मोठा आर्थिक आधार मिळाला असून, आगामी काळात यूडीआयडी प्रमाणपत्राच्या माध्यमातून त्यांच्यासाठी विविध शासकीय योजनांचे दरवाजे खुले होणार आहेत.

