रत्नागिरी: शासन नेहमीच लोककल्याणकारी योजना राबवून जनतेसाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करत असते, या योजनांचा फायदा आपले उत्पन्न वाढवण्यासाठी करा, मात्र यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केले.

कृषी विभागातर्फे प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला काजू कलमे’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा रत्नागिरीत नारायण राणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना राणे यांच्या हस्ते काजू कलमांचे वितरण करण्यात आले.

MP Narayan Rane distributing plants

कोकणातील काजू उत्पादनाला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास चार लाख कलमांचे पूर्णपणे मोफत वाटप केले जाणार आहे.

यामुळे जिल्ह्यातील तब्बल २००० हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली येणार असून, भविष्यात काजूच्या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमानंतर नारायण राणे यांनी संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील विविध झाडांची आणि प्रयोगांची पाहणी केली तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शास्त्रज्ञांकडून संशोधनाची माहिती जाणून घेतली.

या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, संशोधन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी किरण मालशे, संतोष वानखेडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह शास्त्रज्ञ आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.