दापोली : रत्नागिरी जिल्ह्यासाठी अतिशय धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मँगोमॅन (mango man) म्हणून ज्यांची देशभरात ख्याती आहे असे प्राध्यापक डॉ. मुराद बुरोंडकर यांचं निधन झालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण दापोली परिसरात शोककळा पसरली आहे. (Murad burondkar)
समाजात जन्मत:च मोठी असणारी, मोठपण लादल्याने मोठी होणारी आणि स्वकर्तृत्वाने मोठी होणारी अशी तीन प्रकारची माणसे आढळतात. डॉ. मुराद महम्मद बुरोंडकर हे स्वकर्तृत्वाने मोठे झालेले व्यक्तिमत्व होय.
डॉ. मुराद बुरोंडकर यांचा जन्म दि. १३ ऑगस्ट १९६० रोजी झाला. त्यांचे वर्ग १ ते ७ पर्यंतचे शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या मुरूड येथील प्राथमिक उर्दू शाळेत, ८वी ते १०वी पर्यंतचे शिक्षण दापोलीच्या नॅशनल उर्दू शाळेत तर ११वी ते १२वीचे शिक्षण खेड तालुक्याच्या फुरूस येथील कनिष्ठ महाविद्यालयात झाले. त्यांनी कोकण कृषि विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह व एम.एस्सी. (कृषी) ही पदव्युत्तर पदवी वनस्पती शरीरक्रियाशास्त्र विषयात पूर्ण केली. त्यानंतर आचार्य पदवी त्यांनी कर्नाटक राज्यातील कृषी विद्यापीठ, धारवाड येथून सुवर्ण पदकासह प्राप्त करून कोकणची शान वाढवली.
डॉ. मुराद बुरोंडकर यांना ३० वर्षांपेक्षा अधिक आंबा पीक उत्पादन आणि काढणी पश्चात शरीरक्रियाशास्त्र व १५ वर्षांचा भात शरीरक्रियाशास्त्रामध्ये संशोधनाचा दांडगा अनुभव आहे. आंबा उत्पादन तंत्रज्ञानाशी संबंधीत नऊ शिफारसी व तीन संकरित जातींच्या निर्मितीमध्ये थेट संशोधक म्हणून त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे.
आंब्याच्या एक वर्षाआड फळधारणेवर उपाय म्हणून भारतात पहिल्यांदाच सन १९८६ ते सन १९९२ या दरम्यान पॅक्लोब्युटॉझॉलच्या उपयोगासंबधीचे संशोधन त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी ठरले. त्यामुळे हापूस सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असलेल्या झाडाला दरवर्षी लवकर मोहर येऊन आंब्याचे उत्पादन २ ते २.५ पटीने वाढले आहे. मागील २० वर्षापासून कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील आंबा उत्पादक दरवर्षी २० हजार लिटरपेक्षा जास्त पॅक्लोब्युट्रॉझॉलचा उपयोग जवळपास ७ ते १० हजार हेक्टर क्षेत्रासाठी करतात.
कोल्हापूर इथं उपचार घेत असताना त्यांचं निधन झालं आहे. या दुःखद घटनेमुळे एका उमद्या व्यक्तीमत्वाला संपूर्ण राज्य मुकलं आहे. माय कोकण परिवाराची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.