रत्नागिरी : शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती तसेच ‘वाचन प्रेरणा दिन’ १५ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य केतनकुमार चौधरी यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी प्राचार्य चौधरी यांनी वाचन प्रेरणा दिन आणि ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून तंत्रनिकेतनमधील सर्व विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करण्याचा आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा संकल्प केला.

यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात एकत्र बसून सलग एक तास वाचन केले आणि कलाम यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली. विविध पुस्तकांमधील प्रेरणादायी कथा, जीवनमूल्ये आणि वैज्ञानिक माहितीचा विद्यार्थ्यांनी यावेळी आस्वाद घेतला.

या उपक्रमामुळे हा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन केले.