रत्नागिरी : रत्नागिरी शहर एमआयडीसीने दत्तक घेतले असून, स्मार्ट सिटी योजनेसाठी ४५० कोटी रुपये दिले आहेत. येत्या दोन वर्षांत रत्नागिरी स्मार्ट शहर म्हणून उभे राहणार आहे.

आधुनिक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून रत्नागिरी पुढे जात असल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
एमआयडीसीच्या विशेष निधीतून रत्नागिरी नगरपरिषदेच्या दामले विद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आज डॉ. सामंत यांच्या हस्ते कुदळ मारून आणि कोनशिला अनावरण करून झाले.
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, डॉ. शिरीष शेणई, ॲड. दिलीप धारिया, ॲड. फजल डिंगणकर, डॉ. सुमेधा करमरकर, आनंद फडके, राहुल पंडित, बिपिन बंदरकर, शिल्पाताई सुर्वे, श्रद्धा हळदणकर, राजन शेट्ये आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, दामले विद्यालय हे राज्यात नावाजलेले आहे. पहिली ते दहावीच्या १३०० विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळते.
प्रवेशासाठी रांगा लागतात, याचा अभिमान आहे. शिक्षक आणि पालकांचे त्यांनी कौतुक केले. एमआयडीसीच्या १५.३८ कोटी रुपयांच्या निधीतून खासगी शाळांना लाजवेल अशी सुंदर इमारत दामले विद्यालयाची होत आहे.

शासकीय शाळांमध्ये खासगी शाळांसारख्या सुविधा मिळाल्यास विद्यार्थी आकर्षित होऊ शकतात. ही सुरुवात रत्नागिरीतून झाली असून, ही शाळा राज्यात आदर्श ठरावी, असे त्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी योजनेसाठी एमआयडीसीने दिलेल्या ४५० कोटींचा वापर दर्जेदार कामांसाठी करावा, असे आवाहन करताना डॉ. सामंत म्हणाले, बारामतीतील लोक रत्नागिरी पाहायला येतील, असा विश्वास मी व्यक्त केला होता.
नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीतील कामे पाहिली आणि असे प्रकल्प राज्यात उभारण्याचा मानस व्यक्त केला.
गेल्या तीन वर्षांत रत्नागिरीने जीडीपी वाढीत यश मिळवले आहे. पर्यटन जिल्हा असल्याने हजारो पर्यटक येथे येतात, हॉटेल्स पूर्णपणे आरक्षित असतात.
भविष्यात रत्नागिरी जीडीपी वाढीतील राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमली पदार्थ प्रकरणात पकडलेल्या आरोपींना सोडण्यासाठी फोन करणाऱ्या नेत्यांचे नाव पोलिसांनी डायरीत नोंदवावे आणि पत्रकार परिषदेत जाहीर करावे, असे डॉ. सामंत म्हणाले.
अमली पदार्थ देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील. तरुण पिढीला यापासून दूर ठेवण्याची जबाबदारी पालक आणि शिक्षकांची आहे.
यामुळे कुटुंब आणि आयुष्य उद्ध्वस्त होते. पुढील तीन महिन्यांत रत्नागिरी अमली पदार्थमुक्त होईल, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी प्रास्ताविक केले. इस्रोला भेट देण्याची संधी मिळालेल्या पाच विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
विद्यार्थिनी सई जाधव हिने इस्रो भेटीचा अनुभव सांगितला. पालक, शिक्षक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या इमारतीचे स्वरूप
– स्थापना: १९१९
– नगरपरिषदेकडे हस्तांतरण: १९७५
– इमारत: तळमजला, पहिला आणि दुसरा मजला
– प्रति मजल्याचे क्षेत्रफळ: १३५९.७४ चौ. मी.
– एकूण बिल्टअप क्षेत्र: ४३७९.२२ चौ. मी.
– सुविधा: प्रशासकीय विभाग, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, स्वयंपाकखोली, शौचालय
– मैदानी सुविधा: खेळांचे कक्ष, बगीचा, सँडपीट, व्यायामशाळा, खुला खेळाचा मैदान