रत्नागिरी : भारतीय डाक विभाग हे सुमारे १७६ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेले आणि जनतेचा विश्वास संपादन केलेले खाते आहे.
बदलत्या काळानुसार आणि वाढत्या ई-कॉमर्सच्या युगात ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी डाक विभागाने आपल्या सेवांमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत.
आज पार्सल सेवांच्या क्षेत्रात अनेक खासगी स्पर्धक असले तरी भारतीय डाक विभागाने आपल्या व्यापक नेटवर्कच्या जोरावर स्वतंत्र ओळख कायम राखली आहे.

याच पार्श्वभूमीवर ग्राहकांची सातत्याची मागणी आणि काळाची गरज ओळखून रत्नागिरी डाक विभागाने १ जून २०२६ पासून शहरात ‘फ्री पिकअप’ सेवा सुरू केली आहे.
या नव्या सेवेमुळे ग्राहकांना आता पार्सल आणि पत्रे पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.
या सेवेअंतर्गत रत्नागिरी शहर आणि एमआयडीसी परिसरात एक विशेष वाहन फिरून ग्राहकांच्या ठिकाणाहून पार्सल व पत्रांचे संकलन करणार आहे.
यामुळे सामान्य ग्राहक आणि विशेषतः व्यावसायिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. यासोबतच व्यावसायिक ग्राहकांनी ‘बुक नाऊ पे लेटर’ (BNPL) करार केल्यास त्यांना या सुविधेचा अधिक वेगाने आणि सोयीस्कररीत्या लाभ घेता येईल.
रत्नागिरी डाक विभागाच्या या ग्राहकाभिमुख उपक्रमाचे नागरिक आणि व्यावसायिक वर्गातून मोठे स्वागत होत आहे.
या अभिनव सेवेबद्दल ग्राहकांनी अधीक्षक डाकघर ज्ञानेश कुलकर्णी, विपणन अधिकारी गजानन करमरकर, रवींद्र घडशी तसेच रत्नागिरी प्रधान डाकघराचे पोस्टमास्तर आणि हेड पोस्टमन यांचे आभार व्यक्त केले आहेत.

