दापोली: दादा इदाते समरसता प्रतिष्ठान आणि दादा इदाते जन्मोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दादा इदाते यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, २ जून २०२६ रोजी एका विशेष जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दापोली तालुक्यातील टेटवली येथील ज्ञान साधना शांतीपीठ येथे सायंकाळी ४ वाजता पार पडणार आहे. दादा इदाते यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील गरीब, वंचित, आणि भटके-विमुक्त बांधवांच्या कल्याणासाठी व समरसतेसाठी समर्पित केले आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभावे या सदिच्छेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष केरु क्षीरसागर असणार आहेत. तसेच, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक विलास पर्शुराम बुटाला आणि सामाजिक कार्यकर्ते दिनकर अण्णा पाटील उपस्थित राहणार आहेत.
या जन्मोत्सव सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने सदानंद रसाळ आणि नरेश शंकर इदाते यांनी केले आहे.

