दापोली : तालुक्यातील पंचनदी कोलथरे येथील मूळ रहिवासी आणि सध्या सौदी अरेबियातील अल खोबर येथे वास्तव्यास असणारे रियाझ रुमाणे आणि शफीका रुमाणे यांची कन्या नादिया रुमाणे हिला युनायटेड किंगडममधील युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायरमध्ये ‘आउटरीच ॲम्बेसेडर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल तिचे पालक, नातेवाईक आणि संपूर्ण कोकणवासीयांकडून तिचे कौतुक केले जात आहे.

रियाझ रुमाणे यांच्या नादा आणि नादिया या जुळ्या मुली युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायरमधून ‘अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन’ या विषयात बीए (ऑनर्स) पूर्ण करत आहेत.
दोघीही शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती करत असून बालशिक्षण, इन्क्लुसिव्ह एज्युकेशन आणि आधुनिक शिक्षण पद्धतींमध्ये त्यांना विशेष रस आहे.

याच क्षेत्रात त्या आपले करिअर घडवू इच्छितात. त्यांची आई शफीका रुमाणे (मूळ रा. देसाई मोहल्ला, चिपळूण) या गेल्या १५ वर्षांपासून अल खोबर, दम्माम आणि बहरीन येथे नर्सरी आणि किंडरगार्टनचा व्यवसाय चालवत आहेत.
आईच्या पावलावर पाऊल ठेवून दोन्ही मुली या क्षेत्रात पुढे जात आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी नुकतीच अल खोबर येथे अमेरिकन अभ्यासक्रमावर आधारित नाविन्यपूर्ण आणि प्रगत शैक्षणिक सुविधा देणाऱ्या ‘नोव्हा इंटरनॅशनल स्कूल’ची स्थापना करून शैक्षणिक क्षेत्रात मोठे पाऊल टाकले आहे.

पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नादिया ‘स्पेशल अँड इन्क्लुसिव्ह एज्युकेशन’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण (मास्टर्स) घेणार आहे. विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी योगदान देण्याचा तिचा मानस आहे. आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास साधणे हे तिचे प्रमुख ध्येय आहे. तर दुसरीकडे, नादा ही पदवीनंतर एज्युकेशनमध्ये मास्टर्स करणार असून आगामी पिढीसाठी उत्तम शैक्षणिक दर्जा निर्माण करण्यासाठी ती प्रयत्नशील आहे.
रियाझ रुमाणे हे गेल्या २५ वर्षांपासून कुटुंबासह अल खोबर-दम्माम येथे वास्तव्यास असून या भागातील कोकणी समाजाच्या एकतेसाठी आणि कल्याणासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. मुलींच्या या यशाबद्दल समाजबांधवांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या संपूर्ण प्रवासात दोन्ही मुलींना प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे रियाझ रुमाणे यांनी आभार मानले आहेत.

