Chiplun : सावर्डे पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मोबाइल टॉवरच्या तीन बॅटऱ्या, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि अन्य साहित्य असा एकूण ४ लाख २२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सावर्डे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील संशयित वाहन आणि आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घेत होते.
या तपासादरम्यान पथक शासकीय वाहनाने रत्नागिरी ते चिपळूण विभागात गस्त घालत असताना १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी फाट्यापुढे असलेल्या ग्रीन पार्क फॅमिली रेस्टॉरंटसमोर संशयित वाहन उभे असल्याचे आढळून आले.
पथकाने पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जयप्रकाश एकनाथ चिंदरकर (वय ३२, रा. विरार पूर्व, जि. पालघर), नवनाथ भगवान उतेकर (वय ३६, रा. विरार पूर्व, जि. पालघर), कौशिक प्रभाकर जाधव (वय २७, रा. विरार, जि. पालघर) आणि मंगेश मनोज गुरव (वय २०, रा. नालासोपारा, जि. पालघर) हे चौघे मिळून आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत चारही आरोपींनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या २२ हजार ५०० रुपये किमतीच्या मोबाइल टॉवरच्या तीन बॅटऱ्या, गुन्ह्यासाठी वापरलेले साहित्य आणि संशयित वाहन असा एकूण ४ लाख २२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींना आणि हस्तगत केलेल्या मुद्देमालाला पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी सावर्डे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई रत्नागिरीचे प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस हवालदार विजय आंबेकर, वैभव मोरे, गणेश सावंत आणि चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Leave a Reply