दापोली : परदेशी जहाजाला पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ आणि खाजगी दलाल मिलिंद तुकाराम बनप या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बेड्या ठोकल्या आहेत.
रत्नागिरीतील एका शिपिंग एजन्सी व्यावसायिकाने जयगड पोर्टवर एका नादुरुस्त परदेशी जहाजाची दुरुस्ती केली होती. या जहाजाला समुद्र चाचणीऐवजी फायर फायटिंग ट्रायलची परवानगी देण्यासाठी आणि पोर्ट क्लिअरन्स देण्यासाठी वर्ग १ चा अधिकारी असलेल्या संदीप भुजबळ याने व्यावसायिकाकडे तडजोडीअंती ८० हजार रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात १३ नोव्हेंबर रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने १६ नोव्हेंबर रोजी पडताळणी केली.
यावेळी भुजबळ याने तडजोडीतील ६० हजार रुपयांचा पहिला हप्ता खाजगी इसम मिलिंद बनप याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार सापळा रचून मारुती मंदिर परिसरातील हॉटेल कार्निव्हलच्या रेस्टॉरंट बारमध्ये तक्रारदाराकडून ६० हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना मिलिंद बनप याला १६ नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडण्यात आले.
लाच स्वीकारताच बनप याने भुजबळ याला फोनवरून काम झाल्याचे कळवले. या भक्कम पुराव्यांच्या आधारे एसीबीने १७ नोव्हेंबर रोजी मुख्य आरोपी संदीप भुजबळ यालाही ताब्यात घेतले.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही धडक कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे आणि त्यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक शिवराज पाटील व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली.

Leave a Reply