दापोली : शहरातील पोस्टाची आळी येथील सुर्वे कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या किशोर फर्निचर मार्टच्या सामानावर फटाका पडून आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, परिसरातील नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आग वेळेत विझल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
दिवाळीच्या कालावधीत किशोर फर्निचर मार्टने एक्सचेंज योजनेंतर्गत ग्राहकांकडून जुने साहित्य घेतले होते. हे साहित्य सुर्वे कंपाऊंड येथे साठवून ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये जवळपास २२ जुने फ्रिज आणि ३ वॉशिंग मशीनचा समावेश होता.

शनिवारी सायंकाळी या सामानावर अचानक फटाका पडल्याने आग लागली. आगीचा भडका उडाल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि लगतच्या विहिरीला पंप लावून पाण्याचा मारा सुरू केला.
आणीबाणीच्या या परिस्थितीत जालगाव येथील धोपट यांचा पाण्याचा टँकरही वेळेवर दाखल झाला. या टँकरच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.
माहिती मिळताच दापोली नगरपंचायतीची मोटारसायकलवरील अग्निशमन यंत्रणाही घटनास्थळी पोहोचली, मात्र तोपर्यंत नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नातून आग विझवण्यात आली होती.
या दुर्घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती दिनेश जैन यांनी दिली.

Leave a Reply