दापोली : तालुक्यातील प्रसिद्ध आंजर्ले समुद्रात मोठ्या प्रमाणावर जेलीफिश आल्याने पर्यटकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या जेलीफिशच्या संपर्कात आल्यास शरीरावर गंभीर ॲलर्जी, तीव्र स्वरूपाचे रिॲक्शन आणि प्रसंगी जीवघेणा त्रास होऊ शकतो. आज सकाळपासूनच जेलीफिशचा डंख लागल्याने बाधित झालेल्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
त्यामुळे समुद्रात उतरताना किंवा पोहताना पर्यटकांनी अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आंजर्ले परिसरातील सर्व हॉटेल, रिसॉर्ट आणि होमस्टे व्यावसायिकांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
व्यावसायिकांनी आपल्याकडे राहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना समुद्रात जाण्यापूर्वी या संभाव्य धोक्याची स्पष्ट पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे सर्वांचीच जबाबदारी असून, कोणालाही पाण्यामुळे किंवा जेलीफिशच्या डंखामुळे त्रास जाणवल्यास त्यांनी तत्काळ आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी श्रीराज मिलिंद राऊत यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

Leave a Reply